गरज भासल्यास वाढीव निधी
By admin | Published: August 20, 2015 12:38 AM2015-08-20T00:38:48+5:302015-08-20T00:38:48+5:30
कुंभमेळा हा जागतिक आस्थेचे प्रतीक असलेला सोहळा असल्याने त्यासाठी आत्तापर्यंत राज्य शासनाने आर्थिक मदत कमी पडू दिलेली नाही.
नाशिक : कुंभमेळा हा जागतिक आस्थेचे प्रतीक असलेला सोहळा असल्याने त्यासाठी आत्तापर्यंत राज्य शासनाने आर्थिक मदत कमी पडू दिलेली नाही. आणखी काही कामांच्या पूर्ततेसाठी पैशांची गरज भासल्यास वाढीव निधी दिला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या साधुग्राममध्ये वैष्णव आखाड्यांचे ध्वजारोहण व त्र्यंबकेश्वर येथे नाथपंथीय समाज संघाचा नवनाथ मूर्ती प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत बुधवारी झाला. नाशिक महापालिकेने साकारलेल्या साधुग्रामच्या प. पू. जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा झाला. त्यात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कुंभमेळ््यात साधूसंतांच्या सेवेची संधी प्राप्त होते.
कुंभमेळ्याचे नियोजन हा व्यवस्थापन शास्त्रातील विद्यार्थ्यांसाठी संशोधनाचा भाग असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. कुंभमेळ्याची तिथी व मुहूर्त कधी ठरतो हे कोणालाच ठाऊक नसते परंतु तरीही कोणालाही कोणतेही निमंत्रण न देता करोडो हिंदूधर्मीय अगदी मुहूर्तावर सोहळ्यास हजेरी लावतात, असे ते म्हणाले. कुंभमेळ्यासाठी चार वर्षांपूर्वीच आराखडा तयार करून तीन वर्षांपूर्वीच कामे सुरू केली होती. तत्कालीन आघाडी सरकारने त्यासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी दिला होता, त्यामुळे नाशिक जिल्ह्यात रस्ते रुंदीकरण, तीर्थक्षेत्र आणि पर्यटन विकासाची कामे वेगाने झाल्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास, हंसदेवाचार्य, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे अण्णासाहेब मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
शेकडो वर्षांच्या प्रथा-परंपरेनुसार सिंहस्थ कुंभमेळा आजही सुरुच आहे. विश्वाला मार्गदर्शन करण्याची ताकद हिंदू धर्मात आहे, असे प्रतिपादन अमित शहा यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले.
335 एकर साधुग्राममधील वैष्णवांच्या तीनही अनी आखाड्यांमध्ये श्रावण शुद्ध पंचमीच्या मंगल प्रभातसमयी वेदमंत्रोच्चारात ५१ फुटी ध्वजस्तंभांवर देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांच्या हस्ते धर्मध्वजा फडकल्या आणि तपोभूमीत धर्मरक्षणाचा हुंकार घुमत संपूर्ण कुंभपर्वाला दिमाखात
प्रारंभ झाला.
दीडशे वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ कुंभमेळ्यात एकत्रच १३ आखाड्यांतील साधू-महंत शाहीस्नान करीत होते. कालांतराने तीन आखाडे नाशिकला गेले. मात्र सर्व आखाड्यांनी मूळ परंपरा असलेल्या त्र्यंबकेश्वर येथेच शाहीस्नान करावे, अशी अपेक्षा आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी व अमित शहा यांनी त्र्यंबकेश्वर येथे बैठकीत व्यक्त केली.