उच्चभ्रू वस्तीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपी पसार, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 06:33 PM2017-12-03T18:33:57+5:302017-12-03T18:34:11+5:30
ठाणे: उच्चभ्रू वस्तीमध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे: उच्चभ्रू वस्तीमध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोखरण रोड क्रमांक एक परिसरात राहणारी ही पीडित मुलगी १ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास सिद्धांचल फेज एक गृहसंकुलाच्या पदपथावरुन पोखरण रोड क्रमांक दोन येथून जात होती. त्याच वेळी एका दुचाकीवरुन आलेल्या मध्यमवयीन आरोपीने हिरानंदानी मेडोज कुठे आहे, असे विचारण्याचा बहाणा केला. त्यानंतर असभ्य वर्तन करीत तिचा पाठलाग करुन विनयभंग केला.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ही मुलीची भीतीने गाळण उडाली. आपल्या पालकांना तिने हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांच्या मदतीने तिने २ डिसेंबर रोजी सायंकाळी याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात या अनोळखी व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही व्यक्ती कोण आहे, याचा तपास परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे शोधण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक धर्मराज मुकणे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.