इंदापुरात आजी-माजी आमदारांत रंगला कलगीतुरा
By admin | Published: May 3, 2017 01:50 AM2017-05-03T01:50:49+5:302017-05-03T01:50:49+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी तरंगवाडी तलावात पाणी सोडण्याच्या मागणीच्या आंदोलनकर्त्यांसमोर वापरलेली शिवराळ
इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी तरंगवाडी तलावात पाणी सोडण्याच्या मागणीच्या आंदोलनकर्त्यांसमोर वापरलेली शिवराळ भाषा, राज्य सरकार, माजी मंत्री आणि अधिकाऱ्यांचा शिवराळ भाषेत केलेल्या उद्धारामुळे इंदापूर तालुक्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले. त्यांच्या या वक्तव्याचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी समाचार घेण्याची संधी सोडली नाही. त्यांनी भरणे यांचे मानसिक संतुलन
बिघडले असल्याची टीका केली. सर्व बाजूने टीकेची झोड उठल्यावर आमदार भरणे यांनी सारवासारव केली. दि. २५ एप्रिलपासून तरंगवाडी तलावात जोपर्यंत पाणी सोडले जात नाही तोपर्यंत तलावात बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय गोखळी, तरंगवाडी, विठ्ठलवाडी या भागातील शेतकऱ्यांनी घेतला. त्यात बहुसंख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते होते. त्यांची भेट घेण्यासाठी दत्तात्रय भरणे गेले असताना, कार्यकर्त्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने ते गोंधळून गेले.
मागील वर्षी तलावात पाणी आणल्याबद्दल सत्कार करणारे हे शेतकरी आता भंडावून सोडत असल्याचा अनुभव आमदार भरणे यांना आला. आंदोलनकर्त्या समवेत चर्चा करत असताना अचानक भरणे यांच्या रागाचा पारा चढला. त्यांनी राज्य सरकारवर तोंडसुख घेतले. त्याचबरोबर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांना शिवराळ भाषा वापरली. त्यांच्या वक्तव्यानंतर प्रसारमाध्यमांनी टीकेची झोड उठवली.
त्यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतला. पंचायत समिती, नगरपालिकेची सत्ता मिळवता आली नाही त्यामुळे आगामी निवडणुकीचे भवितव्य दिसत असल्याने विद्यमान आमदारांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी टीका त्यांनी केली. खडकवासला व भाटघर धरणे पावसाळ्यात दोन वेळा भरली. उजनी ११० टक्के भरले होते. त्यामधील १०० टक्के पाणी सोलापूरकडे सोडण्यात आले. सध्या भाटघर धरण ४५ टक्के व खडकवासला धरण ३५ टक्के पाणीसाठा आहे.
भाटघर व खडकवासला धरणातून इंदापूर तालुक्यासाठी मिळणारे हक्काचे पाणी बारामती व दौंड तालुक्यांनी तरंगवाडी तलावापासून मदनवाडी तलावापर्यंत बावीस तलावात पाणी सोडले गेले नाही.
तरंगवाडी तलाव हा इंदापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी आरक्षित केला आहे. या तलावावरुन गोखळी, गलांडवाडी, तरंगवाडी, झगडेवाडी आदी गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना आहेत. त्यासह इंदापूर नगरपालिकेचा पाणी प्रश्न निर्माण झाला आहे.
(वार्ताहर)
आमदारांची उंची खुजी : पाटील
सरकारला शिवीगाळ, अधिकाऱ्यांना शिवीगाळीचा प्रयत्न, प्रश्न मांडणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर धावून जाणे, ज्या नेत्याच्या नावावर राजकारण करता, त्याचा एकेरी उल्लेख करणे व माजी लोकप्रतिनिधीला शिवीगाळ करणे हे कृत्य करणाराला तालुक्याचा संस्कारच समजलेला नाही. ज्यांची उंची खुजी आहे, असेच लोक असा प्रकार करतात. लोकशाहीत सत्तेचा ताम्रपट कुणा एकाला कधी मिळत नसतो. लोकांच्या ताकदीवर लोकांसाठी राजकारण करायचे असते. विधानसभा निवडणूक कधी आहे, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली. पंचायत समिती, नगरपरिषद या दोन्हींची सत्ता विरोधकांना मिळवता आली नाही. जिल्हा परिषदेवरही काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर पुढची निवडणूक कोणती आहे,. तिचा निकाल
काय लागणार आहे, याची पूर्वकल्पना आल्याने भरणे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे ते शिवराळ बोलू लागले आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
माजी मंत्र्यांकडून जनतेची दिशाभूल : भरणे
या संदर्भात आमदार भरणे यांनी पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, पाण्याचा प्रश्न काय असतो याची मला जाणीव आहे. इंदापूर तालुक्यातील सामान्य नागरिक, शेतकरी यांची पाण्यामुळे झालेली गंभीर आर्थिक परिस्थिती पाहून मी विधानसभेत संघर्षाची भूमिका घेतली. निलंबन पत्करले. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या व भावना शासनापर्यंत पोहचविण्यासाठी मी माझ्या आधी २० वर्षे तालुक्याचे प्रतिनिधित्व केलेल्या माजी मंत्री महोदयांवर कुठेही टीका केली नाही. कालवा समितीचा जसा मी सदस्य आहे, तसेच माजी मंत्रीसुद्धा कारखान्याचे अध्यक्ष या नात्याने समितीचे सदस्य आहेत. बैठकीमध्ये शांत बसायचे. दुसरीकडे तालुक्यामध्ये आक्रोश मोर्चा काढून माझ्यावर टीका करुन जनतेची दिशाभूल करायची. हा प्रकार ते करत आहेत. इंदापूरसह संपूर्ण राज्यात पाण्याचा प्रश्न असताना, त्यांनी आपल्या सत्तेच्या २० वर्षाच्या अपयशाचे खापर दोन तीन वर्ष आमदार झालेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर फोडले.
अनवधानाने तोंडातून अपशब्द गेले
तरंगवाडीच्या पाणी प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटायला गेलो. तेव्हा त्यांचा उद्रेक पाहून मी त्यांच्या प्रश्नाबद्दल प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न सांगत असताना, अनवधानाने माझ्या तोंडून काही चुकीचे अपशब्द गेले, अशी सारवासारव करत त्यांनी माझ्यासह कुटुंबावर पहिल्यापासून धार्मिक विचारांचा व चांगल्या संस्काराचा प्रभाव आहे, झाल्या प्रकाराबद्दल मी इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी सर्वसामान्य जनतेची दिलगिरी व्यक्त करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.