इंदापूरच्या 'या' दोन शाळांचा राज्यात 'बोलबाला'; कोरोनापासून रक्षण व उत्तम शिक्षणाचा 'असा' आदर्श ठेवला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 06:45 AM2021-01-12T06:45:43+5:302021-01-12T06:50:02+5:30
कोरोनाच्या भयंकर काळातही इंदापूर तालुक्यातील 'या' दोन शाळा नियमितपणे सुरू आहेत.
सागर शिंदे -
इंदापूर : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रातली परिस्थिती बिकट केली. त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद ठरले नाही. पण तरीदेखील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शाळा, महाविद्यालये यांच्याकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.परंतु, आजहीपालक व विद्यार्थीं यांच्या मनात किंतु शिल्लक आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे का नाही किंवा त्याची सुरक्षितता याबदल चिंता आहे. पण याच [परिस्थितीत इंदापूर तालुक्यातील दोन शाळांनी मात्र अभिनव व स्तुत्य उपक्रम राबविताना राज्यासमोर शिक्षण व कोरोनापासून सुरक्षितता यासाठी 'रोल मॉडेल' ठरल्या आहेत.
इंदापूर तालुक्यातील लॉकडाउनच्या काळातही इंदापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने काही ना काही उपक्रम सुरु ठेवत होते. शाळा बंद पण शिक्षण चालू हा उपक्रम सुरू होता. ऑनलाइन पद्धतीने युट्युब त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा अशा विविध योजना इंदापूर तालुक्यातील पंचायत समिती चा शिक्षण विभाग हा राबवित आहे.
पालकांना व विद्यार्थ्यांना कोरोनामुळे आपले हे शैक्षणिक वर्षे वाया गेले असे वाटत असतानाच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व भविष्यात शाळा सुरू झाल्यावर अभ्याक्रम पूर्ण करताना शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची दमछाक होऊ नये यासाठी इंदापूरतील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग मागील दहा महिन्यांपासून प्रयत्नशील राहून विविध उपक्रम राबवत आहेत.
दिवाळीनंतर इंदापूर तालुक्यातील काही शाळांमध्ये 'ओसरी' शाळा हा उपक्रम सुरू केलेला आहे. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ पातळीवरून तसे आदेश आल्याने इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद शाळेमध्ये हा उपक्रम दिवाळीनंतर सुरू केलेला आहे.
इंदापूर तालुक्यातील निमगावकेतकी येथील "भोसलेवस्ती" व "हेगडे वस्ती" या ठिकाणी ओसरी शाळा या दिवाळीपासून नियमितपणे सुरू आहेत. यातील भोसले वस्ती येथील शाळेचा पट एकशे तेवीस आहे. सध्या नियमितपणे या शाळेत ११० पर्यंत विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. हेगडे वस्ती चा शाळेच्या विद्यार्थ्यांचा पट हा तेवीस आहे व तेथेही वीस पेक्षा जास्त विद्यार्थी नियमितपणे हजर राहात असतात. शाळेसमोरील असलेल्या झाडांच्या सावली मध्ये या शाळा नियमितपणे सुरू आहेत.
या शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेण्यात आलेले आहे. शाळा भरण्यापूर्वी पालक आपापल्या पाल्यांना या शाळेत घेऊन येतात. शाळेत आल्यानंतर येथील शिक्षक विद्यार्थ्यांच्या हातावरती सॅनिटायझर तसेच त्यांचे टेंपरेचर चेक करतात. विद्यार्थ्यांच्या बसण्याचे ठिकाण हे पूर्णपणे सॅनिटाईज केलेले असते. तसेच दोन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक अंतर ठेवून तेथील शिक्षक वर्ग हा उत्कृष्टपणे नियोजन करत शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणाचा धडा देत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या या भयंकर काळातही इंदापूर तालुक्यातील या दोन शाळा नियमितपणे सुरू आहेत.
अशाच पद्धतीने इंदापूर तालुक्यातील इतरही शाळा हळूहळू सुरु होणार असून या दोन शाळेचा बोध तालुक्यातील इतर शाळांनी घ्यावा असेही आवाहन शिक्षण अधिकारी यांच्याकडून केले जात आहे. अशा पद्धतीने जर महाराष्ट्रातील प्राथमिक शाळा सर्वत्र सुरू झाल्या तर वाया जात असलेल्या शैक्षणिक वर्षाची चिंता मिटेल व मुलांनाही ही योग्य शिक्षण मिळेल हे नक्कीच.
_____________
नाविन्यपूर्ण अशा उपक्रम राबविणाऱ्या शाळांना शासकीय स्तरावर गौरव करणार..
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील भोसले वस्ती व हेगडे वस्ती येथील शाळांनी राबवलेला उपक्रम मी स्वतः व गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी सर्व परिस्थिती पहिली आहे, तेथील शिक्षक भोंग आणि शेंडे यांनी राबवलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे इंदापूर तालुक्यातील अशा नावाने उपक्रम राबवण्यास शाळांना शासकीय स्तरावर गौरवण्यात येणार आहे.
विजयकुमार परीट, गटविकास अधिकारी, इंदापूर पंचायत समिती, इंदापूर.
_____________