धनगर समाजाच्या मतांसाठी इंदापूरचा निर्णय लटकला
By अतुल कुलकर्णी | Published: September 5, 2019 08:37 PM2019-09-05T20:37:17+5:302019-09-05T20:43:40+5:30
सध्या इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दत्ता भरणे आमदार आहेत.
- अतुल कुलकर्णी
मुंबई : धनगर समाजाची मते आपल्या विरुद्ध जातील या भीतीने इंदापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडायचा की नाही. यासाठी राष्ट्रवादी पक्ष निर्णय घेऊ शकत नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळेच या जागेचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी घेतील, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
सध्या इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दत्ता भरणे आमदार आहेत. ते धनगर समाजाचे आहेत. त्यांना उमेदवारी न देता ती हर्षवर्धन पाटील यांना दिली तर त्याचा परिणाम कर्जत-जामखेड आणि बारामती मतदारसंघात होऊ शकतो, अशी भीती राष्ट्रवादीला वाटते. कर्जत-जामखेडमधून रोहित पवार उभे राहणार आहेत. तेथे भाजपाच्या तिकीटावर मंत्री राम शिंदे उभे राहणार आहेत. राम शिंदे हे धनगर समाजाचे नेते आहेत.
एका मतदार संघातून धनगर समाजाच्या स्वपक्षातल्या उमेदवाराला नाकारायचे आणि दुस-या मतदारसंघात धनगर समाजाच्या नेत्याविरुद्ध आपला नातेवाईक उभा करायचा याचा फटका बारामती मध्ये स्वत: अजित पवार यांना बसेल, याची खरी भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. कारण, बारामतीमध्ये देखील धनगर समाजाची मते मोठ्या प्रमाणावर आहेत. शिवाय, महादेव जानकर हे धनगर समाजाचे आणखी एक नेते विरोधात आहेत. या सगळ्या परिस्थितीमुळे इंदापूरचा निर्णय होत नाही, असे एका नेत्याने स्पष्ट केले.
इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या भाषणाबद्दल जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, त्यांनी भाषणात काय मुद्दे मांडावेत हा त्यांचा प्रश्न आहे. पण, त्यांनी थोडी घाई केली, असे आपल्याला वाटते. आमची आघाडीच्या बैठकीत यावर चर्चा सुरु आहे. जेव्हा चर्चा झाली. त्यावेळीच आम्ही हा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर सोपवावा, अशी विनंती केली होती. त्यांचा जो निर्णय असेल, तो आम्हाला मान्य असेल, असेही आम्ही बैठकीतच स्पष्ट केल्याचे जयंत पाटील म्हणाले.
आणखी कोणते मतदार संघ शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर सोपवले आहेत? असे विचारले असता ते म्हणाले, फक्त इंदापूरचाच निर्णय त्यांच्यावर सोपवला आहे. बाकी निर्णय दोन्ही पक्षांनी बैठकीत घेतले आहेत. आमचे प्रत्येकी ११० जागांवर निर्णय झाले आहेत. अन्य कोणत्या मतदारसंघात असे वाद नाहीत, असेही जयंत पाटील म्हणाले.
इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर सभा घेऊन ‘मी काय केले पाहिजे’, असा सवाल कार्यकर्ते, पदाधिका-यांना केला होता. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांनी आपल्याला साडेचार वर्षात पहिल्यांदा फोन केला, असेही सांगितले होते. त्यावेळी खा. सुप्रिया सुळे, स्वत: शरद पवार यांनी आपल्याला शब्द दिला होता. पण आता ते दिलेल्या शब्दापासून दूर जात आहेत, ही आपली फसवणूक यापूर्वीही अनेकदा झाली आहे, असेही ते म्हणाले होते.