Maharashtra Political Crisis: “नाराज नाही, देवेंद्र फडणवीसांवर पूर्ण विश्वास, अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून...”: रवी राणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 03:34 PM2022-08-11T15:34:07+5:302022-08-11T15:35:19+5:30
Maharashtra Political Crisis: नव्या शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्याने अपक्ष आमदार रवी राणा हे नाराज झाल्याची चर्चा रंगली होती.
Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा अखेर ३८ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. यानंतर आता कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांच्यासह रवी राणा यांचा समावेश होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, या मंत्रिमंडळात संधी मिळू शकलेली नाही. यातच आता नाराज नसल्याचे स्पष्टीकरण अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिले आहे.
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती अपक्ष आमदार रवी राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्यावरून चांगलेच चर्चेत आले होते. तेव्हा शिवसेना आणि राणा-दाम्पत्यांमधील संघर्ष शिगेला गेल्याचे पाहायला मिळाले. यानंतर या दोघांना अटक करून काही दिवसांचा कारावासही भोगावा लागला होता. भाजपने राणा दाम्पत्याच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आता नव्या शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्रिपद न मिळाल्याने अपक्ष आमदार रवी राणा हे नाराज झाल्याची चर्चा रंगली होती. परंतु देवेंद्र फडणवीस अमरावतीमधून योग्य व्यक्तीची निवड करतील, असा विश्वास आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला.
मंत्रिपद मागितले नाही आणि मी नाराजही नाही
उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे ऑनलाईन सरकार चालवले. मात्र आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने मजबूत सरकार आले आहे. मी कधीही मंत्रिपद मागितले नाही आणि मी नाराजही नाही. कुठल्याही अपक्ष आमदाराने नाराज व्हायची गरज नाही. देवेंद्र फडणवीस यांना अमरावती जिल्ह्याची जाण आहे. ते योग्य वेळी योग्य व्यक्तीची निवड अमरावतीमधून मंत्री आणि पालकमंत्री म्हणून करतील, असे आमदार रवी राणा यावेळी म्हणाले. अमरावती जिल्ह्याला कोण योग्य न्याय देऊ शकतो याची फडणवीस यांना चांगली कल्पना आहे, ते योग्य व्यक्तीची लवकरच निवड करतील, असे रवी राणा यांनी म्हटले आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
दरम्यान, शिवसेनेत झालेल्या बंडखोरीच्या वेळी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांची निवड आणि विश्वासदर्शक ठरावात रवी राणा यांनी भाजपची साथ दिली. महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते.परंतु शिंदे-फडवणीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात रवी राणा, बच्चू कडू यांना संधी मिळालेली नाही. त्यामुळे ते नाराज असल्याचे म्हटले जात आहे. आपण नाराज नसल्याचे जरी ते सांगत असले तरी त्यांच्या वक्तव्यांवरुन त्यांची नाराजी स्पष्ट दिसते. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाली नाही तरी दुसऱ्या विस्तारात संधी मिळेल, असा आशावाद त्यांना आहे.