रेल्वेसाठी राज्यात स्वतंत्र महामंडळ
By admin | Published: January 5, 2015 04:28 AM2015-01-05T04:28:14+5:302015-01-05T04:28:14+5:30
राज्यातील रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य व केंद्राच्या सहभागातून एक स्वतंत्र महामंडळ स्थापन केले जाणार असून,
रत्नागिरी : राज्यातील रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य व केंद्राच्या सहभागातून एक स्वतंत्र महामंडळ स्थापन केले जाणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या आठवड्यात तपशीलवार चर्चा होईल व त्याबाबत संयुक्तपणे घोषणा होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी दिली.
गेल्या काही वर्षांत रेल्वेची दयनीय अवस्था झाली आहे. त्यातून रेल्वेला उभारी द्यायला काही वेळ लागणार आहे. त्याची सुरुवात झाली आहे. रेल्वेबाबतची वस्तुस्थिती दर्शविणारी श्वेतपत्रिका आपण तयार केली आहे. त्यानुसार रेल्वेत काय नवीन करायला हवे याचे मार्गदर्शन होईल, असे प्रभू यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. आज जेवढे उत्पन्न तेवढाच खर्च अशी रेल्वेची स्थिती असून, नवीन प्रकल्प राबवायचे कसे, प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा द्यायच्या कशा? रेल्वेचे अनेक प्रकल्प केवळ सुरुवात होऊन ठप्प झाले आहेत. त्यामुळेच रेल्वेला या दुष्टचक्रातून बाहेर काढले जाईल व देशवासीयांना रेल्वेच्या अत्याधुनिक सुविधा दिल्या जातील. रेल्वेतील सुधारणांबाबत आपण पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करीत असल्याचेही ते म्हणाले. प्रभु यांनी घोषणा केल्यामुळे कोकण रेल्वेच्या असंख्य सम्यांवर तोडगा निघण्याची आशा वाटत आहे.