...आता शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी हॉटेल मॅनेजमेंटचा स्वतंत्र अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 05:45 AM2018-05-06T05:45:46+5:302018-05-06T05:45:46+5:30
येत्या शैक्षणिक वर्षापासून देशातील सर्व २१ केंद्रीय हॉटेल मॅनेजमेंट संस्थांमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पदवी अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. यापूर्वी केवळ सहा संस्थांमध्ये शाकाहार व मांसाहार असे दोन पर्याय देण्यात आले होते. त्यामुळे देशभरातील शाकाहारी विद्यार्थ्यांना केवळ शाकाहाराची पदवी घेण्याचे पर्याय खुले झाले आहेत.
पुणे : येत्या शैक्षणिक वर्षापासून देशातील सर्व २१ केंद्रीय हॉटेल मॅनेजमेंट संस्थांमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पदवी अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. यापूर्वी केवळ सहा संस्थांमध्ये शाकाहार व मांसाहार असे दोन पर्याय देण्यात आले होते. त्यामुळे देशभरातील शाकाहारी विद्यार्थ्यांना केवळ शाकाहाराची पदवी घेण्याचे पर्याय खुले झाले आहेत.
हॉटेल मॅनेजमेंट संस्थांमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत पुण्यातील सनदी लेखापाल चंद्रशेखर लुणिया हे सहा वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. या पाठपुराव्यामुळे मागील दोन वर्षांत पर्यटन मंत्रालयांतर्गत असलेल्या सहा केंद्रीय संस्थांमध्ये असा अभ्यासक्रम सुरू झाला. आता उर्वरित १५ संस्थांमध्येही शाकाहारी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी लुणिया यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, अचल जैन, नरेंद्र छाजेड आदी उपस्थित होते.
हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात सुमारे ४० विषय शिकविले जातात. त्यामध्ये एक विषय अन्नपदार्थ बनविणे हा आहे. त्याअंतर्गत शाकाहारी व मांसाहारी पदार्थ शिकविले जातात. त्यामुळे शाकाहारी विद्यार्थ्यांना इच्छा नसताना मांसाहाराचे प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यासाठी अभ्यासक्रमात शाकाहारी पर्याय सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. दोन वर्षांपूर्वी गांधीनगर, भोपाळ व जयपूर तर मागील वर्षी चेन्नई, हाजीपूर व शिलाँग येथील संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला.
येत्या शैक्षणिक वर्षापासून उर्वरित संस्थांमध्ये हा पर्याय देण्याचा निर्णय पर्यटन मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे शाकाहारी विद्यार्थ्यांना शाकाहारी पदार्थ बनविण्याचे स्वतंत्र प्रशिक्षण घेण्यासाठी पर्याय उपलब्ध झाले आहेत, असे लुणिया यांनी सांगितले.