फेसबुक लाइव्हमध्ये रवी राणा हनुमान चालीसा विसरले; नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 12:36 PM2022-06-13T12:36:48+5:302022-06-13T14:01:40+5:30
एकशे एक वेळा हनुमान चालीसा पठण केल्याचा दावा करणारे रवी राणा या फेसबुक लाइव्हमध्ये मात्र अनेकदा चुकल्याचे सांगितले जात आहे.
अमरावती: गेल्या अनेक दिवसांपासून अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rane) आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा कौर (Navneet Rana) यांनी हनुमान चालीसा पठणावरून रान उठवलेले पाहायला मिळत आहे. सुरुवातीला शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानावर हनुमान चालीसा पठण करण्याच्या निर्धारावरून चांगलेच राजकारण तापलेले होते. यानंतर दिल्लीसह राज्यातील काही ठिकाणी राणा दाम्पत्यांनी हनुमान चालीसा पठण केले. मात्र, एका फेसबुक लाइव्ह दरम्यान खुद्द रवी राणा हनुमान चालीसा विसल्याचे समोर आले आहे. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांची चांगलीच शाळा घेतल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत आपण भाजपसोबत असल्याचे आमदार रवी राणा यांनी जाहीर केले होते. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या स्मार्ट खेळीमुळे भाजपचा मोठा विजय झाला. ही निवडणूक आणि त्याच्या निकालाचे विश्लेषण करण्यासाठी रवी राणा यांनी फेसबुक लाइव्ह केले होते. यावेळी रवी राणा यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर चांगलीच चिखलफेक केली. मात्र, हनुमान चालीसा आणि त्यातील दाखले देताना राणा यांची चांगलीच तारांबळ उडाली.
फेसबुक लाइव्हमध्ये रवी राणा हनुमान चालीसा विसरले
एकशे एक वेळा हनुमान चालीसा पठण केल्याचा दावा करणारे रवी राणा या फेसबुक लाइव्हमध्ये मात्र चुकल्याचे सांगितले जात आहे. हनुमान चालीसामधील काही ओळींचा संदर्भ देताना राणा एक-दोनदा नव्हे तर अनेकदा चुकले. त्यांचे उच्चारही व्यवस्थित निघत नसल्याचे बघून नेटकऱ्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. काही काळानंतर आमदार रवी राणा यांना ही पोस्ट डिलीट करण्याची नामुष्की ओढवली. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असल्याचे सांगितले जात आहे. रवी राणा यांच्या या विसरण्याची राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु झाल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या दिवशीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसा पठणाचे आव्हान रवी राणा यांनी दिले होते. मतदानाआधी खार येथील निवासस्थानी एकशे एकवेळा हनुमान चालिसा पठण केल्याचा दावाही रवी राणा यांनी केला होता. उद्धव ठाकरे म्हणताहेत कशमीरमध्ये जाऊन हनुमान चाळीसा वाचा. मातोश्रीबाहेर उद्धव ठाकरे ज्यावेळी हनुमान चाळीसा वाचतील, त्यादिवशी कशमीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा पठण करेन, असे रवी राणा यांनी म्हटले होते.