अपक्ष आमदारांना मत दाखवता येणार नाही, केंद्रीय निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 08:32 AM2022-06-09T08:32:03+5:302022-06-09T08:32:32+5:30
rajya sabha election 2022 : अपक्ष आमदार ज्या पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत त्या पक्षाच्या प्रतिनिधीला त्याने त्याचे मत दाखविणे बंधनकारक असेल का, अशी विचारणा विधानमंडळ कार्यालयाने निवडणूक आयोगाला केली होती.
मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला होणाऱ्या निवडणुकीत अपक्ष आमदारांना त्यांचे मतदान कुणाला दाखवता येणार नाही, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.
अपक्ष आमदार ज्या पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत त्या पक्षाच्या प्रतिनिधीला त्याने त्याचे मत दाखविणे बंधनकारक असेल का, अशी विचारणा विधानमंडळ कार्यालयाने निवडणूक आयोगाला केली होती.
पक्षांच्या आमदारांना त्यांचे मत तिथे उपस्थित पक्षाच्या प्रतिनिधीला दाखवूनच करावे लागते आणि ते दाखविले नाही वा पक्षाचा व्हिप झुगारून अन्य उमेदवारास मत दिले तर ते मत अवैध ठरते असा नियम आहे. अपक्ष आमदारांच्या मतदानाबाबत आयोगाने स्पष्ट केले की, ते कोणालाही दाखवून मत करू शकत नाहीत आणि तसे केले तर त्यांचे मत बाद ठरते. त्यामुळे अपक्ष आमदारांना व्हिप लागू होणार नाही व कुणाला दाखवून मत देता येत नाही.
आशिष शेलार यांचा दावा
भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दावा केला की माजी मंत्री अनिल देशमुख व मंत्री नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता येणार नाही, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान मंडळ कार्यालयाला कळविले आहे.