Maharashtra Politics: रवी राणा आणि बच्चू कडूंच्या वादावर नवनीत राणा स्पष्टच बोलल्या; एका वाक्यात दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 03:38 PM2022-11-03T15:38:38+5:302022-11-03T15:38:52+5:30
Maharashtra News: रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादाचा दुसरा अंक सुरू झाल्याचे पाहायला मिळत असून, यावर नवनीत राणा यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाला पाठिंबा देणारे बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि भाजप समर्थक रवी राणा (Ravi Rana) यांच्यात सुरू असलेला वाद शमताना दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. यानंतर रवी राणा यांनी शब्द मागे घेतल्यानंतर आता बच्चू कडू यांनीही पहिली वेळ आहे म्हणून माफी देतो, असे सांगत हा वाद मिटल्याचे जाहीर केले. मात्र, पुन्हा एकदा दोघांमधील संघर्ष उफाळून येताना दिसत आहे. यातच आता अपक्ष आमदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी या वादावर प्रतिक्रिया व्यक्त करत स्पष्ट शब्दांत भूमिका मांडलेली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांना रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर मला त्या विषयावर काही बोलायचे नाही. तो माझा विषय नाही. मी माझ्या कामावर लक्ष देते. मला माझे काम महत्त्वाचे आहे, असे नवनीत राणा म्हणाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत, ते ज्याप्रमाणे ते बोलतात, त्या प्रमाणे आम्ही करतो, असे नवनीत राणा यांनी नमूद केले.
एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही या वादाकडे कसे पाहता?
एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही या वादाकडे कसे पाहता, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर, तो माझा विषय नाही. मी घरी रवी राणा यांची पत्नी आहे, बाहेर लोकसेवक आहे. माझ्यापेक्षा ते ज्येष्ठ आहेत, माझ्यापेक्षा त्यांना जास्त समजते, असे सांगत या वादावर अधिक प्रतिक्रिया देणे नवनीत राणा यांनी टाळले.
दरम्यान, राणा विरुद्ध कडू यांच्यातील वाद पुन्हा समोर आला आहे. बच्चू कडूंनी जाहीर सभेतून टीका केल्यानंतर राणांनीही दम भरला. त्यानंतर, बोलताना आमदार कडू यांनी माध्यमांनाही आवाहन केले आहे. तसेच, रवी राणांनी तलवार घेऊन यावे अन् मला कापावे, असेही कडूंनी शांतपणे म्हटले. रवी राणांनी दिलगिरी व्यक्त केली, मीही आभार मानले, आता हा विषय संपला, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, मला दम देत असाल तर घरात घुसून मारण्याची धमकी रवी राणांनी दिली. त्यानंतर कडू यांनी मी घरात आहे. ज्याला घरी यायचे आहे त्यांनी यावे, आम्ही तयार आहोत, अशा शब्दांत रवी राणांवर पलटवार केला आहे. त्यामुळे राणा-कडू यांच्या वादाचा दुसरा अंक सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"