नवी मुंबईत लवकरच स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2017 03:33 AM2017-06-27T03:33:31+5:302017-06-27T03:33:31+5:30

शहरवासीयांच्या सोयीसाठी लवकरच नवी मुंबईत स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने घेतला आहे.

Independent passport office in Navi Mumbai soon | नवी मुंबईत लवकरच स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय

नवी मुंबईत लवकरच स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शहरवासीयांच्या सोयीसाठी लवकरच नवी मुंबईत स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने घेतला आहे. लवकरच यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक यांनी यासंदर्भात सुषमा स्वराज यांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेत, स्वराज यांनी हा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई शहराची लोकसंख्या १२ लाखांच्या घरात आहे. येथील रहिवाशांना पासपोर्ट विषयक कामासाठी ठाणे येथील पासपोर्ट कार्यालयात जावे लागते. या कार्यालयाचे कार्यक्षेत्र आणि उपलब्ध असलेला अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे पासपोर्ट मिळण्याच्या कामाला विलंब लागत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांसाठी स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुरू करावे, अशी मागणी संजीव नाईक यांनी १७ जून २0१७ रोजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना दिलेल्या पत्राद्वारे केली होती. या पत्राची दखल घेत, सुषमा स्वराज यांनी नवी मुंबईत पोस्ट आॅफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचे मान्य केले आहे.
पासपोर्ट योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबईकरांसाठी स्वतंत्र पोस्ट आॅफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात येईल, असे संजीव नाईक यांना पाठविलेल्या पत्रात सुषमा स्वराज यांनी नमूद केले आहे. या निर्णयामुळे पासपोर्ट विषयक कामासाठी ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसराच्या फेऱ्या मारणाऱ्या शहरवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवी मुंबईत मोठी औद्योगिक वसाहत आहे. मोठ-मोठे आय.टी. पार्क आहेत. हॉटेल व्यवसाय वाढला आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाची क्र ीडा संकुले आहेत. शैक्षणिक केंद्र म्हणून नवी मुंबईचा लौकिक आहे. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे.
जेएनपीटी येथे चौथ्या पोर्टचे निर्माणकार्य सुरू आहे. मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात शहरात पासपोर्टची गरज वाढणार आहे. नवी मुंबई स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्यास त्याचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान, या प्रस्तावित पासपोर्ट कार्यालयाचा केवळ नवी मुंबईच नव्हे, तर पनवेल, खारघर आणि उरण परिसरातील नागरिकांनाही फायदा होईल, असे संजीव नाईक यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Independent passport office in Navi Mumbai soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.