पोलीसांच्या संरक्षणासाठी स्थापणार स्वतंत्र पोलीस दल
By admin | Published: September 7, 2016 03:14 PM2016-09-07T15:14:22+5:302016-09-07T15:14:22+5:30
एकेकाळी स्कॉटलंड यार्डशी तुलना होणाऱ्या आपल्या पोलीसांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र पोलीस दल उभारण्यात येणार असल्याचे समजते.
Next
>योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
पोलीसांची कुणालाच... विशेषत: समाजकंटकांना भीतीच वाटत नसल्यामुळे पोलीसांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. एकेकाळी स्कॉटलंड यार्डशी तुलना होणाऱ्या आपल्या पोलीसांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र पोलीस दल उभारण्यात येणार असल्याचे समजते. वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
रझा अकादमीच्या आंदोलनाच्या वेळी आझाद मैदान परीसरात आंदोलकांनी पोलीसांना मोठ्या प्रमाणावर मारहाण केली होती, ज्याच्या निषेधार्थ राज ठाकरेंनी आझाद मैदानातच बंदी असूनही प्रचंड मोठी सभा घेत या हल्ल्यांचा निषेध केला होता. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत अनेकवेळा पोलीसांवर हल्ले झाले आहेत. काल तर कल्याण येथील गणेशमंडळाच्या कार्यकर्त्यांनी एका पोलीसाला गणेश विसर्जन तलावात बुडवण्याचा प्रयत्न केला.
या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीसांचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र पोलीस दल उभारण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी सोडल्याचे समजते. पोलीस महासंचालकांसह ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत पोलीसांच्या संरक्षणासंदर्भात अनेक मुद्यांवर चर्चा झाली. पोलीसांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र पोलीस दल उभारेपर्यंत पोलीसांनी काय काळजी घ्यावी यावरही चर्चा झाली असून महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे...
- पोलीसांनी नेहमी स्वत:जवळ मिरचीची पूड बाळगावी.
- दिवस वाईट असल्याने शक्यतो संध्याकाळी सातच्या आत पोलीस ठाण्यात परतावे. विशेषत: रात्री दहा नंतर कुठेही एकटं जाऊ नये, बरोबर किमान दोन पोलीस असतील याची दक्षता घ्यावी.
- कुठल्याही कारणासाठी जमाव जमला असेल, तर जमावामध्ये आणि स्वत:मध्ये किमान 20 फूटांचे अंतर ठेवावे.
- व्हीआयपी प्रोटेक्शन, म्हणजे राजकारण्यांच्या सुरक्षेसाठी ड्युटीवर असलेल्या पोलीसांनी शस्त्र बाळगू नये, ते अन्य पोलीसांना द्यावे कारण राजकारण्यांकडे व त्यांच्या खासगी अंगरक्षकांकडे जास्त चांगली शस्रे असतात.
- प्रत्येक पोलीसाने मोबाईलमध्ये खासगी सुरक्षा संस्थांचे फोन नंबर सेव्ह करून ठेवावे, आणि तसाच प्रसंग ओढवला तर त्यांना लागलीच बोलावून घ्यावे.
- बेकायदेशीर कृत्यांसाठी कुणाचीही गाडी अडवल्यानंतर, आधी ओळख विचारावी, जर आपल्या कुवतीपेक्षा वरची ओळख निघाली तर उगाच रिस्क न घेता सोडून द्यावे. परंतु, जर ती व्यक्ती आम आदमी असेल, तर त्याला लागलीच कायद्याचा बडगा दाखवावा.
- ड्युटीवर असताना शक्यतो झोपू नये. परंतु, 24 - 24 तास ड्युटी लावली असेल तर झोपताना, बंदुकीची नळी जमिनीवर, व दांडा हनुवटीखाली ठेवून झोपावे. उलट पद्धत अवलंबल्यामुळे काही जणांनी प्राण गमावले आहेत.
- भेंडी बाजारात गस्तीसाठी वा कारवाईसाठी जायचे असल्यास आमदार राज पुरोहीतांशी सल्लामसलत करून, त्यांनी गो अहेड म्हटल्यावरच जावे.
- पोलीसांनी रोज सकाळी धावण्याचा व्यायाम करावा, अडीअडचणीला पळून जायला केवळ याचाच फायदा होईल.
- अत्यंत कमी संख्येमुळे पोलीसांवर प्रचंड ताण आहे, आणि त्याचा राग कुठे ना कुठे बाहेर येतो. परंतु, स्वसुरक्षेच्या दृष्टीकोनातून, आत्ता जी प्रथा आहे ती, म्हणजे, साधे, गरीब, पापभिरू, पोलीसांना घाबरणाऱ्या नागरिकांवरच सगळा राग बाहेर काढावा, त्यांना वेठीस धरावं. उगाच, दांडग्यांपुढे नी राजकीय किंवा गुंडांचं पाठबळ असलेल्या उडाणटप्पूंना वर्दीची हैसियत दाखवायला जावू नये.
- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, घरातून निघताना साध्या कपड्यात यावं, ठाण्यात आल्यावर गणवेश चढवावा. घर ते पोलीस ठाणे या प्रवासात कुठलाही अतिप्रसंग ओढवला तर सरकार जबाबदार नसेल.
(ही वात्रटिका आहे. कृपया खरी बातमी समजू नये.)