साध्वींसाठी स्वतंत्र व्यवस्था!

By admin | Published: July 18, 2015 12:17 AM2015-07-18T00:17:34+5:302015-07-18T00:17:34+5:30

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यातील महिला आणि पुरुष साधुंमधील वादावर पडदा पडला असून, येत्या दोन-तीन दिवसांत साध्वींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असल्याची घोषणा

Independent system for Sadhvis! | साध्वींसाठी स्वतंत्र व्यवस्था!

साध्वींसाठी स्वतंत्र व्यवस्था!

Next

मुंबई : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यातील महिला आणि पुरुष साधुंमधील वादावर पडदा पडला असून, येत्या दोन-तीन दिवसांत साध्वींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असल्याची घोषणा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत केली.
सिंहस्थ कुंभमेळा सुरू झाला तरी पायाभूत सुविधांची कामे अपूर्ण असल्याबद्दल जयंतराव जाधव यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना महाजन म्हणाले की, नाशिक येथील तपोवन आणि साधुग्राममधील पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत. या कुंभमेळ्यासाठी एकूण २३७८ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यापैकी २५ टक्के निधी महापालिका उपलब्ध करून देणार आहे. तर उर्वरित निधी राज्य आणि केंद्र सरकार देणार आहे. मात्र केंद्र सरकारकडून ६८९ कोटींचा निधी अजूनही प्राप्त न झाल्यामुळे नाशिक महापालिकेला कर्ज काढावे लागल्याचे सांगत केंद्राचा हिस्सा मिळवण्यासाठी राज्य सरकारतर्फे पाठपुरावा केला जात आहे, असेही ते म्हणाले. प्र्रशासनाकडे डॉक्टरांची कमतरता असल्याने कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच साधुग्राम येथील संत, महंत यांच्यासाठी पुरेसा धान्यपुरवठा होत नसल्याची बाबही शासनाने गंभीरपणे घेतली असून, त्याची सखोल चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

जंतुनाशकाच्या खरेदीची चौकशी
कुंभमेळ्याकरिता साडे चार कोटींची जंतुनाशके आरोग्य विभागाने खरेदी करून ती परस्पर नाशिकला पाठवण्यात आली. मात्र महानगरपालिकेने या जंतुनाशकांची मागणी केलीच नव्हती. मग या जंतुनाशकांची परस्पर खरेदी का केली गेली त्याची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती महाजन यांनी या लक्षवेधीच्या चर्चेदरम्यान दिली.

व्हीआयपी व व्हीव्हीआयपींना बंदी
पंतप्रधानांसह ज्येष्ठ नेत्यांना कुंभमेळ्याचे निमंत्रण दिले आहे. मात्र, शाही स्नानावेळी मोठी गर्दी होते. त्यामुळे या काळात व्हीआयपी व व्हीव्हीआयपीला प्रवेश देऊ नये, अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. त्याप्रमाणे शाही स्नानाप्रसंगी व्हीआयपींना मनाई केली आहे.

विमानसेवेसाठी पाठपुरावा करणार
नाशिक-पुणे विमानसेवा मागील आठवड्यात सुरू केली. परंतु विमानाचे भाडे ५ हजार व हॉल्टींग चार्ज ३५ हजार रुपये हा खर्च खासगी कंपनीला परवडत नसल्याने कंपनीने ही सेवा बंद केली. त्यामुळे भाडे कमी करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला आहे. - गिरीश महाजन

Web Title: Independent system for Sadhvis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.