स्वतंत्र विदर्भ ही जनसामान्यांची मागणी
By admin | Published: December 19, 2015 02:00 AM2015-12-19T02:00:27+5:302015-12-19T02:00:27+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्य ही ९७ टक्केजनसामान्यांची मागणी आहे. मुंबईसाठी बलिदान केलेल्या १०५ हुतात्म्यांबद्दल मला आदरच आहे. मात्र, स्वतंत्र विदर्भासाठीचा माझा सत्याग्रह
औरंगाबाद : स्वतंत्र विदर्भ राज्य ही ९७ टक्केजनसामान्यांची मागणी आहे. मुंबईसाठी बलिदान केलेल्या १०५ हुतात्म्यांबद्दल मला आदरच आहे. मात्र, स्वतंत्र विदर्भासाठीचा माझा सत्याग्रह हा वैयक्तिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकनायक बापूजी अणे यांचीही हीच भूमिका होती, असे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्पष्ट केले.
चार आयोगांनी आपल्या अहवालात स्वतंत्र विदर्भाची शिफारस केली होती. कायदेशीर मार्गानेच स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न सोडविला जावा, राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करूनच ही प्रक्रिया व्हावी, अशी माझी आग्रही भूमिका आहे, असे अणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते एका याचिकेच्या सुनावणीसाठी औरंगाबादला आले होते.
सेनेची भूमिका अधिवेशनापुरतीच होती काय, या प्रश्नावर अणे म्हणाले की, अधिवेशन हे एक निमित्त होते. ती भूमिका त्यांच्या पक्षाच्या विचारधारेचा भाग आहे. वेगळ््या विदर्भाला सेनेचा दीर्घकाळापासून विरोध आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती ही आर्थिकदृष्ट्या योग्य असेल काय, या प्रश्नाला उत्तर देताना अणे म्हणाले की, इंग्रज देश सोडून गेले
तेव्हा तसेच पंजाब, कर्नाटक, आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन एकापेक्षा अधिक राज्यांची निर्मिती झाली, तेव्हासुद्धा हा मुद्दा उपस्थित
झाला नाही. स्वतंत्र राज्य का
नको, यासाठी या मुद्याचा वापर केला जातो. जनमत विचारात घेऊन कायदेशीर प्रक्रियेद्वारे, शांततेच्या मार्गानेच स्वतंत्र विदर्भाची निर्मिती व्हावी, अशी आमची भूमिका आहे. (प्रतिनिधी)
सलमान खान प्रकरणी आव्हान देणार का?
अभिनेता सलमान खानबाबतच्या निकालाविरुद्ध राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहे काय, असे विचारले असता अणे म्हणाले, उपरोक्त प्रकरणाचा नुकताच निकाल लागला आहे. त्याबाबत सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकले जाईल. नंतर हे प्रकरण गृह आणि विधी व न्याय विभागाकडे पाठविल्यानंतर महाधिवक्त्यांकडे अभिप्रायासाठी पाठविले जाते. ही प्रक्रिया होण्यासाठी जवळपास दोन-तीन महिने लागतात. प्रकरण महाधिवक्त्यांकडे पाठविणे बंधनकारक नाही. ती एक प्रथा आहे, असे अणे म्हणाले.