Independence Day 2021 : "देशात आणि राज्यातही सुरू असलेल्या द्वेषमूलक प्रचारामुळे तरुण पिढीच्या स्वप्नांचा बळी जाऊ नये"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 12:22 PM2021-08-15T12:22:54+5:302021-08-15T12:38:20+5:30

MNS Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

India 15 Auguest 75th Independence Day 2021 MNS Raj Thackeray facebook Post | Independence Day 2021 : "देशात आणि राज्यातही सुरू असलेल्या द्वेषमूलक प्रचारामुळे तरुण पिढीच्या स्वप्नांचा बळी जाऊ नये"

Independence Day 2021 : "देशात आणि राज्यातही सुरू असलेल्या द्वेषमूलक प्रचारामुळे तरुण पिढीच्या स्वप्नांचा बळी जाऊ नये"

googlenewsNext

मुंबई - देशभरात आज 75 व्या स्वातंत्र्य दिनाचा (Celebration 15th Auguest 2021) उत्साह पाहायला मिळत आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "सात दशकांत जे व्हायचं होतं ते झालं, पण आता यापुढच्या प्रत्येक दशकात काय करायचं ते आपल्या हातात आहे. माझ्या, तुमच्या, आपल्या सर्वांच्या हातात!" असं म्हटलं आहे. "देशातील प्रश्न सोडवायचे असतील तर तुकड्या-तुकड्यात विचार करून चालणार नाही. त्यांना  समग्रतेने भिडावं लागेल. त्यासाठी सर्वात आधी एक देश म्हणून आपल्याला विचार करावा लागेल. देशात आणि राज्यातही सुरू असलेल्या द्वेषमूलक प्रचारामुळे तरुण पिढीच्या स्वप्नांचा बळी जाऊ नये" असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

"एका स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून आपण सर्वजण आज ७५व्या वर्षात पदार्पण करत आहोत. मी 'आपण' असं म्हणतोय कारण शेवटी देश म्हणजे लोकच- 'आम्ही भारताचे लोक'! 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हापासून आजपर्यंत आपण अनेक क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती केली. पण ही प्रगती सर्वसमावेशक होऊ शकली का? सर्व राज्यांना या प्रगतीचा लाभ मिळाला का? दुर्दैवाने या प्रश्नाचं उत्तर 'नाही' आहे. असंतुलित प्रगती आणि विकासामुळे आज देशापुढे नवीनच प्रश्न उभे राहिले आहेत. महाप्रचंड लोकसंख्या, शेतीपुढील आव्हानांमुळे उद्योग- सेवा क्षेत्रावर रोजगारनिर्मितीचा आलेला ताण, शिक्षण आणि रोजगार संधी यांमधील समन्वयाचा अभाव आणि यातूनच होणारे महाभयंकर स्थलांतर! हे प्रश्न सोडवायचे असतील तर तुकड्या-तुकड्यात विचार करून चालणार नाही. त्यांना समग्रतेने भिडावं लागेल. त्यासाठी सर्वात आधी एक देश म्हणून आपल्याला विचार करावा लागेल" असंही ते म्हणाले. 

"गेली सात दशकं आपल्या देशात रस्ते, पाणी, वीज याच मूलभूत विषयांवर निवडणूका लढवल्या जात आहेत. आत्ता आत्ता कुठे शिक्षण आणि आरोग्यावर आपल्याकडे चर्चा सुरू झालीये. प्रदूषण, जैवविविधता, पर्यावरण संवर्धन यांमध्ये जागतिक पातळीवर काय चिंतन सुरू आहे, याची आपल्याकडच्या लोकप्रतिनिधींना साधी कल्पनाही नसावी. पण सुदैवाने तरुण पिढी या प्रश्नांबाबत जागरूक आहे. जगातल्या घडामोडींवर बारीक नजर ठेवून असलेली तरुण पिढी आपल्या देशात नेमकं काय 'मिसिंग' आहे, हे बरोबर ओळखून आहे. या पिढीला जपायला हवं."

"देशात आणि आपल्या राज्यातही सर्वच पातळ्यांवर सुरू असलेल्या द्वेषमूलक प्रचारामुळे या तरुण पिढीच्या स्वप्नांचा बळी जाऊ नये, उलट सामाजिक विद्वेष पसरवणाऱ्या सत्तापिपासूंच्या छाताडावर उभं राहून 'सत्यमेव जयते'चा नारा बुलंद करण्याचं बळ त्यांच्या अंगी यावं, यासाठी पोषक वातावरण निर्माण करणं, ही काळाची गरज आहे. सात दशकांत जे व्हायचं होतं ते झालं, पण आता यापुढच्या प्रत्येक दशकात काय करायचं ते आपल्या हातात आहे. माझ्या, तुमच्या, आपल्या सर्वांच्या हातात! स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!" असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 
 

Web Title: India 15 Auguest 75th Independence Day 2021 MNS Raj Thackeray facebook Post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.