India China FaceOff: सणांवरील चिनी आक्रमणाला प्रत्युत्तर हवे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 04:30 AM2020-06-23T04:30:02+5:302020-06-23T04:30:30+5:30
सजावटीच्या वस्तू, फटाके, पतंग, मांजा यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
मोरेश्वर मानापुरे
नागपूर : चायनीज वस्तूंनी केवळ भारतीय बाजारपेठांवरच नव्हे तर आपल्या पारंपरिक सणांवरही आक्रमण केले आहे. सणांमुळे होणाऱ्या स्थानिक उलाढालीला यामुळे फटका बसत असून, जागोजागी चायनीज उत्पादनेच दिसून येतात. यात सजावटीच्या वस्तू, फटाके, पतंग, मांजा यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
भारतीय सणांचे आपल्या जीवनातील एकूण महत्त्व लक्षात घेता चिनी हल्ल्याला स्वदेशीच्या शस्राने प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. विशेषत: समाज व सरकारी पातळीवर स्थानिक उत्पादकांना बळ देण्याचा संकल्प सोडण्याची आवश्यकता आहे, असा सूर देशाच्या सर्वच भागांमधून उमटताना दिसत आहे. भारतीय सणांच्या काळात देशात मोठी आर्थिक उलाढाल होते. चीनमधून येणाºया ‘रेडिमेड’ मालाची किंमत कमी असल्याने विक्रेते व ग्राहक आकर्षित होतात. आपल्या देशातच सजावटीची बाजारपेठ दहा हजार कोटींहून अधिक आहे. यात गणेशोत्सव, दुर्गोत्सव, लग्नसमारंभ यांच्याबरोबरच दिवाळी, दसरा, होळी यासारखे सणही आहेत. याशिवाय दिवाळीचे फटाके, होळीचे रंग, संक्रांतीच्या काळातील पतंग व मांजा चीनमधून येत आहेत. केवळ मुंबई, कोलकाता, दिल्ली ही मोठी शहरेच नव्हेत, लहान शहरांचे मार्केटही या वस्तूंनी काबीज केल्याचे चित्र आहे.
>उत्सवांमध्ये नकोच चिनी माल
चीनमधून येणाºया वस्तू या टिकाऊ नसतात. शिवाय त्यांची ‘गॅरंटी’ही नसते व पर्यावरणाच्या दृष्टीनेदेखील त्या धोकादायक असतात. विविध माध्यमांतून सुरू असलेल्या जागृतीमुळे बाजारात चिनी मालावरील भारतीयांचा विश्वास कमी होत असल्याचे विक्रेते मान्य करीत आहेत; परंतु चिनी मालाला १०० टक्के हद्दपार करण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे.
>चिनी फटाके जीवघेणेच
चिनी फटाक्यांमुळे शिवकाशीतील कारखान्यांना फटका बसला. मात्र, केंद्र सरकारच्या नियमावलीनंतर ‘नीरी’सारख्या संस्थेने स्वदेशी ‘ग्रीन क्रॅकर्स’ तयार केले. त्यामुळे आता लोक चिनी फटाक्यांकडे पाठ फिरवू लागले आहेत. देशातील फटाक्यांमुळे भारतातून दहा हजार कोटींचा निधी चिनी उत्पादकांना मिळण्यापासून वाचेल.
>केंद्राने कठोर
धोरण आखावे
चिनी वस्तूंच्या आयातीवर प्रतिबंध लावण्याची गरज आहे. याकरिता व्यापारी सज्ज आहेत. केंद्राने कठोर धोरण आखावे.
- राजू माखिजा, माजी अध्यक्ष, जनरल मर्चण्ट असोसिएशन
>विक्रेते दाखवू
शकतात चीनला इंगा
‘कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स’ने मागील वर्षी केलेल्या सर्वेक्षणात लोक आता चिनी वस्तूंकडे पाठ फिरवीत असल्याचे समोर आले होते.
या वस्तूंविरोधात प्रचार-प्रसार केल्यानंतर ८ हजार कोटींऐवजी तीन हजार २०० कोटींच्या सजावटीच्या चायनीज वस्तूंची विक्री होऊ शकली होती. याशिवाय फटाके, मांजा, पतंग इत्यादीच्या विक्रीतदेखील ३० टक्क्यांहून अधिक घट झाली, असे दिसून आले होते.
केंद्र सरकारने मागे चिनी मालावरील सीमाशुल्क वाढविण्याचे सूतोवाच केले होते. सद्य:स्थितीत अनेक वस्तूंवर केवळ १५ ते २० टक्केच कर आकारला जातो. या करात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याशिवाय चिनी माल हद्दपार होणे शक्य नाही, असे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे.