India China Faceoff: मोदीजी, चीनला खूश करण्यासाठी 'ते' धोकादायक विधान केलंत का?; काँग्रेसचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 01:55 PM2020-06-26T13:55:10+5:302020-06-26T13:59:10+5:30
लडाखमधील भारत-चीन तणवावरून काँग्रेस आक्रमक; मोदींवर प्रश्नांची सरबत्ती
मुंबई: लडाख सीमेवर निर्माण झालेल्या तणावावरून काँग्रेसनं मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भारतीय जमिनीवर कोणीही घुसखोरी केली नाही, असं अत्यंत धोकादायक विधान मोदींनी का केलं, असा सवाल काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. मोदींनी केलेल्या वक्तव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम झाला असून पुढील वाटाघाटीत आणि चर्चेत त्याचा फटका भारताला बसू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
१५ जूनला गलवान खोऱ्यात चिनी सैन्यानं भारतीय जवानांवर हल्ला केला. त्या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले. या पार्श्वभूमीवर मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधला. त्यात त्यांनी भारतीय भूमीवर कोणतीही घुसखोरी झाली नसल्याचा दावा केला. तो धागा पकडून पृथ्वीराज चव्हाण यांनी काही प्रश्न विचारले. आमच्या देशात घुसखोरीच झाली नाही असं अत्यंत धोकादायक विधान मोदींनी का केलं? त्यांच्या विधानाचं चीनकडून स्वागत झालं. चीनच्या अध्यक्षांसोबतचे संबंध जपण्यासाठी मोदींनी हा अतिशय धोकादायक दावा केला का? असे प्रश्न चव्हाण यांनी विचारले.
लडाखवरील प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. मोदींच्या विधानाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम झाला. चीनकडून त्यांचं कौतुक झालं. चीनमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली. मात्र मोदींच्या विधानामुळे भारताच्या वाटाघाटी करण्याच्या क्षमतेवर प्रतिकूल परिणाम आहे. मोदींनी असे दावे करून चिनी कटकारस्थांना बळ देऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं.
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि मोदींचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आतापर्यंत त्यांच्यात १९ बैठका झाल्या आहेत. भारतात आलेले जिनपिंग अहमदाबादलाच गेले होते. त्यामुळे त्यांना न दुखावण्याच्या हेतूनं मोदींनी घुसखोरी झालीच नसल्याचा दावा केला का, असा सवाल चव्हाण यांनी विचारला. गलवान खोरं, पँगाँग परिसरात चीननं मोठा फौजफाटा तैनात केला आहे. लष्करीदृष्ट्या महत्त्वाची बांधकामं केली आहेत. सॅटेलाईट फोटोंमधून ते उघड झालं आहे. त्यामुळे मोदींचा दावा आपोआप खोडला गेला आहे, असं चव्हाण म्हणाले. प्रश्न उपस्थित करणं विरोधकांचं काम असून त्या प्रश्नांना उत्तरं देणं ही सरकारची घटनात्मक जबाबदारी असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं.