भारताकडून समूह पध्दतीने संकटाचा सामना - मोहन भागवत
By admin | Published: June 26, 2016 01:26 PM2016-06-26T13:26:38+5:302016-06-26T13:26:38+5:30
नैसर्गिक असो अथवा अस्मानी संकट असो़ या संकटांचा सामना भारतीय नागरिक समूह पध्दतीने करुन हिमतीने उभे राहतात़ जगामध्ये मात्र असे दिसत नाही़
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. २६ : नैसर्गिक असो अथवा अस्मानी संकट असो़ या संकटांचा सामना भारतीय नागरिक समूह पध्दतीने करुन हिमतीने उभे राहतात़ जगामध्ये मात्र असे दिसत नाही़ जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेतील लोक सप्टेंबर महिन्यात घराबाहेर पडत नाहीत़ कारण या महिन्यात वर्ल्डट्रेड सेंटरवर हल्ला झाला होता़ या हल्ल्याची भिती आजही त्यांच्या मनात आहे़ आपण बाँम्बस्फोट झाला तरी दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडून परिस्थितीला सामोरे जातो, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे रविवारी व्यक्त केले़
जलयुक्त लातूर उपक्रमातंर्गत मांजरा नदीच्या १८ किमीचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे़ या नदीपात्रात स्थिरावलेल्या पाण्याचे कलशपूजन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले़ याप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी जलयुक्त लातूरचे मार्गदर्शक डॉ़ अशोक कुकडे, अॅड़ मनोहर गोमारे, अॅड़ त्र्यंबकदास झंवर, मकरंद जाधव, सुनील देशपांडे, अरुण डंके, निलेश ठक्कर आदींची उपस्थिती होती़
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, पर्यावरणाची जूनी दृष्टी आपणाला आहे़ पण, जून्या परंपरागत ज्ञानाची किंमत आपण केली नाही़ त्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत़ जूने ज्ञान टाकाऊ नसते़ या ज्ञानाची परीक्षा घेऊन नवे ज्ञान स्विकारले पाहिजे़ लातूरकरांनी जलयुक्तचा प्रयोग राबवून हाच आदर्श घालून दिला आहे़ शासनावर अवलंबून न राहता स्वत:च मार्ग शोधला आहे़ शासनावर अवलंबून असणारा समाज हा शासन व समाजाला वळण लावू शकत नाही़ शासन आपण निर्माण केलेली प्रणाली आहे़ या प्रणालीवर समाज म्हणून आपला धाक असला पाहिजे़
आपला देश निसर्ग समृध्द आहे़ निसर्गाशी कसे वागावे, याचे ज्ञान आपणाला आहे़ त्यामुळे जगात सुजलाम्- सुफलाम् असलेली आपली ख्याती अद्याप डागाळलेली नाही़ शेतीचे शास्त्र आपण अनुभवातून विकसित केले आहे़ उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हार पत्कारुन पळून जाणे आपला धर्म नाही़ परिस्थितीशी दोन हात करुन मार्ग शोधणे आणि हिम्मत दाखवून उभे राहणे हा आपल्या देशाचा स्वभाव आहे़ लातूरच्या पाणीटंचाईची देशभरात चर्चा झाली़ जोधपूरमध्येही लातूरची चर्चा होती़ जोधपूरवासियांनी पाण्याच्या दुर्भिक्षावर हिमतीने मार्ग शोधला़ तसाच मार्ग जलयुक्त लातूरच्या माध्यमातून लातूरकरांनी शोधला आहे़ परिस्थितीवर मात करुन उभे राहण्याचा आपला स्वभाव सिध्द केला आहे़.
मराठवाड्यात लातूर आणि देशात महाराष्ट्र अशी आपली एकसंघता आहे़ त्यातून बंधूभाव व मानवता हा विचार येतो़ देशात विविधता आणि वेगवेगळी विचारसरणी असली तरी बंधूभाव आहे़ त्यामुळेच आपण संकटाचा सामना करतो़ जलयुक्त लातूरच्या चळवळीत अशीच वेगवेगळ्या विचारधारेची माणसं एकत्र येऊन पाणी संकटाचा सामना करीत आहेत़ लातूरचे हे उदाहरण देशाला प्रेरणादायी ठरेल, असेही ते म्हणाले़
विज्ञानाच्या अंहकारामुळे परंपरागत चांगल्या ज्ञानाकडे दुर्लक्ष होत आहे़ परंतु, जुन्या ज्ञानाची परीक्षा करुन त्यातील योग्य ज्ञान स्विकारायला हवे़ परंपरागत जूनी दृष्टी टाकाऊ नसते़ याकडे लक्ष देण्याची गरज आहे़ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावरच काम करीत असून संघ लातूरच्या जलयुक्त चळवळीसोबत आहे़ लातूरने पाणीटंचाईवर मात करणारे एक सुंदर चित्र उभे केले आहे़ हे चित्र देशाला आदर्श ठरेल, असेही मोहन भागवत म्हणाले़.
प्रास्ताविक जलयुक्त चळवळीचे मुख्य मार्गदर्शक डॉ़ अशोक कुकडे यांनी केले़ सूत्रसंचालन प्राचार्य डॉ़ जोगेंद्रसिंह बिसेन यांनी केले़ आभार सुनील देशपांडे यांनी मानले़