कोरोना लशीसाठी ‘सीरम’चे ‘इंडिया फर्स्ट’; पंतप्रधानांनी दिली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 02:27 AM2020-11-29T02:27:11+5:302020-11-29T02:27:31+5:30
भारतातील कोरोना लस वितरणासंदर्भात अद्याप केंद्र सरकारने कोणतीही लेखी मागणी नोंदवलेली नाही.
पुणे : कोरोना लस वितरणासाठी ‘सिरम’चे प्राधान्य भारतालाच असेल. त्यानंतर आफ्रिकी देशांना लस दिली जाईल, असे सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी शनिवारी स्पष्ट केले. युरोप-इंग्लंडसाठी लस पुरवण्याचा मुद्दा आमच्यापुढे नाही. आवश्यकता पडलीच तर भविष्यात त्याचा विचार करता येईल, असे त्यांनी सांगितले.
इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अँस्ट्राझेन्का यांच्यातर्फे विकसित केल्या जाणाऱ्या कोरोनावरील कोविशिल्ड लसीचे उत्पादन ‘सीरम’मध्ये सुरु झालेे आहे. त्याची पाहणी करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरमला भेट दिली. त्यानंतर अदर पुनावाला यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पुनावाला म्हणाले की भारतातील कोरोना लस वितरणासंदर्भात अद्याप केंद्र सरकारने कोणतीही लेखी मागणी नोंदवलेली नाही. मात्र जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी डोस लागणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. आम्ही सध्या दरमहा ५ ते ६ कोटी डोस तयार करत आहोत. येत्या जानेवारीपासून दरमहा १० कोटी डोसचे उत्पादन केले जाईल.पंतप्रधानांनी लसीची उत्पादन प्रक्रिया, सर्व लसींचे फायदे-तोटे, मर्यादा, किंमती आणि कोविशिल्डच्या प्रत्यक्ष वापराच्या नियोजनावर चर्चा केली. आरोग्य मंत्रालयाला पुढील वर्षीच्या पहिल्या टप्प्यात १० कोटी डोस हवे आहेत, असे पुनावाला म्हणाले.
पंतप्रधानांचे ट्वीट
सीरम संस्थेच्या टीमशी चांगला संवाद झाला. आतापर्यंतची लस निर्मितीतील प्रगती आणि भविष्यातील उत्पादन क्षमतेवर त्यांनी सखोल माहिती दिली. उत्पादन प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करता आली. - नरेंद्र मोदी