भारतात सर्वाधिक बोलली जाते हिंदी, 'माय मराठी'चा देशात कितवा नंबर ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 09:12 PM2018-07-06T21:12:15+5:302018-07-06T21:16:36+5:30
देशात जवळपास 800 भाषा आणि अंदाजे 200 बोलीभाषा बोलल्या जातात. मात्र, एका सर्व्हेक्षणानुसार भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषांचा अभ्यास करण्यात आला आहे.
मुंबई - भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात अनेक जाती, धर्म, पंथ आणि भाषा पाहायला मिळतात. त्यामुळेच भारत हा विविधतेत एकता असलेला देश म्हणून जगभरात ओळखला जातो. भारत देशाची प्राकृतिकदृष्या रचना करण्यात आली आहे. त्यामुळे भारतातील विविध राज्यांत त्यांच्या प्रांताचीच भाषा मूळ किंवा मातृभाषा म्हणून बोलली जाते. देशात जवळपास 800 भाषा आणि अंदाजे 200 बोलीभाषा बोलल्या जातात. मात्र, एका सर्व्हेक्षणानुसार भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा हिंदी असून मराठीचा देशात तिसरा क्रमांक लागतो. देशात मराठी बोलणारांची संख्या 7.1 टक्के आहे.
भाषा हे संवादाचे प्रमुख माध्यम आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात भाषेला अनन्यसाधारण महत्व आहे. 2011 मध्ये एका सर्व्हेक्षणाद्वारे भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये मराठी भाषेचा तिसरा क्रमांक लागतो. राष्ट्रभाषा हिंदी ही देशात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. देशातील 45 टक्के जनता हिंदी भाषेत आपला संवाद साधते. त्यामुळे हिंदी हीच देशाची मूळ भाषा असल्याचे मानण्यात येते. हिंदीनंतर भारतात बंगाली भाषा सर्वाधिक बोलली जाते. देशातील 8.3 टक्के नागरिक बंगाली भाषा बोलतात. तर आपली मायबोली मराठी या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील 7.1 टक्के जनता मराठी भाषा बोलते. मराठीनंतर अनुक्रमे तेलुगू आणि तमिळ भाषेचा नंबर लागतो. देशात 6.9 टक्के तेलुगू तर 5.9 टक्के तमिळ भाषा बोलली जाते. या भाषांना द्राविडीयन भाषा, असेही म्हणतात. त्यानंतर भारतात सहाव्या क्रमांकावर गुजराती तर 7 व्या क्रमांकावर उर्दू भाषांमध्ये संवाद साधला जात असल्याचे या सर्व्हेक्षणातून समजते. उर्वरीत मान्यताप्राप्त 15 भाषांमध्ये 15 टक्के लोकं संवाद साधतात. तर 99 विना अनुसूचित भाषांचा वापर केवळ 3 टक्के लोकांकडून करण्यात येतो. त्यामुळेच विविध कला, संस्कृती, चालीरिती, वेशभूषा आणि भाषांनी समृद्ध बनलेला भारत जगभरात महान मानला जातो. तर अंदाजे 2 हजार वर्षांचा इतिहास असलेल्या मायबोली मराठीलाही देशात मानाचे स्थान आहे.