ई-कॉमर्समध्ये भारताला संधी
By admin | Published: December 14, 2015 12:25 AM2015-12-14T00:25:41+5:302015-12-14T00:25:41+5:30
जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिले जात असून, देशाला ई- कॉमर्समध्ये मोठी संधी आहे.
पुणे : जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिले जात असून, देशाला ई- कॉमर्समध्ये मोठी संधी आहे. परदेशी ई-कॉमर्स कंपन्यांनीसुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सुलभ असे स्वतंत्र मॉडेल तयार केले आहे. केंद्र शासनातर्फे ई-कॉमर्सच्या माध्यमातून देशाच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी रविवारी सांगितले. तसेच युवा शक्तीसह प्रत्येकाने देशाच्या विकासात विविध प्रकारे योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
सिम्बायोसिस विद्यापीठाच्या १२ व्या पदवी प्रदान समारंभात सिन्हा बोलत होते. याप्रसंगी बार कौन्सिल आॅफ इंडियाचे अध्यक्ष मननकुमार मिश्रा, सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रमुख व्यसस्थापकीय संचालक डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, कुलसचिव डॉ. एस. सी. नेरकर उपस्थित होते.
चीन, अमेरिकेनंतर भारत हा आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे सांगून सिन्हा म्हणाले, भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी सातत्यपूर्ण विकास, ना नफा, ना तोटा तत्त्वावरील विकासाचे मॉडेल उभारावे लागणार आहे. त्याअंतर्गत देशातील उत्पादनक्षमता, मानव संसाधनाचा पुरवठा, नैसर्गिक साधनसंपत्तीचा सदुपयोग यासोबत ई- कॉमसर्मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून उच्चभ्रू वर्गातील नागारिकांसाठी ई-कॉमर्सची आवश्यकता आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या काटकसरी विकास मॉडेलने शाश्वत जागतिक विकासाला गती मिळू शकेल.
दरम्यान, पदवी प्रदान समारंभात विधी, व्यवस्थापन, आरोग्य विज्ञान, डिझाईनिंग, अभियांत्रिकी आदी विद्याशाखांमधील एकूण ४ हजार ९८१ विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर व पदविका प्रदान करण्यात आल्या. तसेच ३८ विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी, तर ८ गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी संस्थेच्या विकासाच्या वाटचालीची माहिती देऊन सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. रजनी गुप्ते यांनी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांची माहिती दिली. डॉ. विद्या येरवडेकर यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी)