भारत is my country...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2016 01:19 AM2016-10-16T01:19:00+5:302016-10-16T01:19:00+5:30

भारत माझा देश आहे... (फक्त ही भावना तेव्हाच जागी होते, जेव्हा बॉर्डरवर पाकिस्तानी सैनिक आपल्या जवानांना हकनाक गोळ्या घालतात किंवा आपण एखादी क्रिकेटची मॅच हरतो

India is my country ... | भारत is my country...

भारत is my country...

googlenewsNext

- प्रसाद ओक

भारत माझा देश आहे... (फक्त ही भावना तेव्हाच जागी होते, जेव्हा बॉर्डरवर पाकिस्तानी सैनिक आपल्या जवानांना हकनाक गोळ्या घालतात किंवा आपण एखादी क्रिकेटची मॅच हरतो आणि कोणीतरी 'भारत देशी बार'मधे बसून खूप वैतागलेला असतो... तेव्हाच हं... )
सारे भारतीय माझे बांधव आहेत...
(तरी हिंदू-मुस्लीम दंगे होतात, तेव्हा आधी मी माझ्या घरच्या बांधवांनाच वाचवतो आणि परक्या बांधवांना घरात येऊन शिव्या घालतो.)
माझ्या देशावर माझे प्रेम आहे...
(पण प्रेमासाठी असलेल्या इतर सगळ्या गोष्टींमधून मला वेळ मिळेल तेव्हा हं.)
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
(म्हणूनच दहीहंडीच्या दिवशी दह्याऐवजी दारू ढोसून आम्ही आमच्याच इगोची मटकी फोडतो. गणपतीच्या मांडवाखाली ‘बसतो’ आणि ‘चकणा’ म्हणून मोदक खातो. होळी रंगपंचमीला जगात फक्त 'काळा'च रंग शिल्लक असावा, अशा मनोवृत्तीने वागतो. क्रिसमसला त्यांच्याकडे संता असला, तरी आपल्याकडे संत आहेत आणि काही क्लॉज घालून दिलेत हे विसरून आपण ‘रम’माण होतो आणि दिवाळीत नको त्या 'दारू'ची आतषबाजी करतो.)
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन, प्रत्येकाशी सौजन्याने वागेन...
(फक्त हे सगळे जेव्हा माझ्या मनासारखे वागायची मला परवानगी देतील तेव्हाच आणि गुरुजन असताना पालक का शिकवतात किंवा आईवडील असताना गुरुजन कशाकरिता माया अन् प्रेम दाखवतात... किंवा प्रत्येक वडीलधारा माणूस आगाऊ नसतो किंवा प्रत्येक आगाऊ माणूस वडीलधाराही नसतो. अशा सगळ्या शंका माझ्या मनातून दूर होतील तेव्हाच हं)
माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे...
(फक्त लाच घेताना किंवा भ्रष्टाचार करताना आपण कोणाला किंवा कोणी आपल्याला पाहिले तर गुपचूप बसणे, सांभाळून घेणे... म्हणजे सो कोल्ड निष्ठा राखणे नाही, हे जेव्हा मला किंवा समोरच्याला कळेल तेव्हाच हं...)
त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे...
( जुगार, मटका, लॉटरीमुळे... ‘झालं कल्याण’ असे आपण म्हणतो, ते हे कल्याण नव्हे आणि... सुरू केली तेव्हा पंधरा-वीस दिवसांत एखादा पेग घ्यायचा, आता बसल्याजागी रोज दीड खंबा संपवतो... ही ती 'समृद्धी' नव्हे... हे जेव्हा कळायचे त्याला कळेल तेव्हाच हं...)
असो...
कंसा बाहेर माझा देश बोलतोय...
आणि कंसात माझी कंट्री बोलतेय...

(लेखक प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आहेत.)

Web Title: India is my country ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.