भारत सहिष्णू, मात्र द्वेष पसरवणा-यांना मोदींनी थांबवण्याची गरज - आमीर खान
By admin | Published: March 5, 2016 08:11 PM2016-03-05T20:11:37+5:302016-03-05T20:16:04+5:30
भारत सहिष्णू देश आहे, मात्र काही लोक द्वेष पसरवत आहेत त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगाम घालावा असं आवाहन अभिनेता आमीर खानने केलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ५ - भारत सहिष्णू देश आहे, मात्र काही लोक द्वेष पसरवत आहेत त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगाम घालावा असं आवाहन अभिनेता आमीर खानने केलं आहे. भारत असहिष्णू आहे असं वक्तव्य केल्यानंतर आमीर खानवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती ज्यानंतर त्याला 'अतुल्य भारत'सहित सरकारच्या अनेक योजनांच्या बॅण्ड अॅम्बेसिडर पदावरुन हटवण्यात आलं होतं. सरकारने जरी मला काढून टाकलं असलं तरी आपण अजूनही देशाचा बॅण्ड अॅम्बेसिडर आहोत कारण भारत माझी माता आहे बँण्ड नाही असं आमीर खानने म्हणलं आहे.
इंडिया टीव्हीवरील आप की अदालत या कार्यक्रमात आमीर खानने हे वक्तव्य केलं आहे. आपला देश सहिष्णू आहे, मात्र या देशात द्वेष पसरवणारे लोक खूप आहेत जे देशाचे तुकडे करणार अस म्हणत आहेत. सर्व धर्मात अशी लोक आहेत, त्यांना फक्त मोदीजी थांबवू शकतात. नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आहेत आपण त्यांना सांगितलं पाहिजे असं आमीर खान बोलला आहे.
न्यायालयीन व्यवस्थेमुळे सुरक्षेची भावना निर्माण होते त्यामुळे जलद न्याय मिळण्याची गरज आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे, कोणीही न्यायव्यवस्थेपेक्षा मोठा नाही. मात्र दुर्देवाने काही लोक आहेत जे द्वेष आणि नकारार्थी गोष्टी पसरवत आहेत. पंतप्रधानांनी देखील याप्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. त्यांची तर घोषणाचं आहे 'सबका साथ सबका विकास' असं आमीर खान या मुलाखतीदरम्यान बोलला आहे.
माझ्या भारत असहिष्णू वक्तव्याला चुकीच्या अर्थाने घेतलं गेल्याचंही आमीर खान यावेळी बोलला. मी कधीच भारत असहिष्णू आहे असं बोललो नव्हतो, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. असहिष्णूता वाढत आहे आणि असहिष्णू आहे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. जरी सरकारने मला बॅण्ड अॅम्बेसिडर पदावरुन काढून टाकलं असलं तरी मी देशाचा बॅण्ड अॅम्बेसिडर राहणार. आपली भारतभुमी माझ्यासाठी माता आहे आणि ती बॅण्ड असू शकत नाही. माझ्या आईकडे मी बॅण्ड म्हणून कधीच पाहू शकत नाही. दुस-यांसाठी असेल पण माझ्यासाठी हा बॅण्ड नाही असं मत आमीर खानने व्यक्त केलं आहे.