‘कोरोना’चा मुकाबला करण्यासाठी भारत सज्ज! डॉ. रमण गंगाखेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 11:03 AM2020-02-01T11:03:34+5:302020-02-01T11:08:06+5:30
विषाणूला घाबरून जाऊ नये..
राजानंद मोरे -
पुणे : चीनमध्ये वैगाने फैलावणाºया कोरोना विषाणूचा धसका जगाने घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आणीबाणी घोषित करून त्यावर शिक्कामोर्तब केले. भारतामध्येही एक रुग्ण सापडला आहे. पण या विषाणूला घाबरून जाण्याची गरज नाही. चीनमधून आलेल्या प्रवाशांनी योग्य प्रकारे काळजी घेतल्यास या विषाणूचा फैलाव आपण रोखू शकतो. ‘कोरोना’चा मुकाबला करण्यासाठी आपण सर्व प्रकारे सज्ज असल्याची ग्वाही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) साथरोग व संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली. पद्मश्री किताब जाहीर झाल्याबद्दल ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी किताब मिळाल्याचा आनंद व्यक्त करतानाच ‘कोरोना’च्या सद्यस्थितीविषयी माहिती दिली.
* पद्मश्री किताब जाहीर झाल्यानंतरची भावना काय?
पद्मश्री किताब मिळेल, हे अपेक्षित नव्हते. त्यामुळे सुरुवातीला धक्का बसला. कारण आपल्याला कोणी गॉडफादर नाही, ही भावना बळकट झाली होती. पण भारतामध्ये आपण जितके मेहनत करू त्याला त्याचे फळ मिळते, याचा प्रत्यय यानिमित्ताने आला. ही खूप गर्वाची बाब आहे. इतर देशांमध्ये हे दिसत नाही. पद्मश्रीसाठी विविध संघटनांकडून अर्ज केले होते. पण आजपर्यंत कोणत्याही पुरस्कारासाठी कधी अर्ज केला नाही. निपाह आणि झिका विषाणूसंदर्भात मी खूप काम केले होते. त्यावेळी दहा देशांचे एक संशोधन व्यासपीठ निर्माण केले होते. महिला व मुलांमध्ये संक्रमित होणाऱ्या एड्सविषयीचे संशोधन मला करता आले. आपल्या कामाची दखल घेतल्याचा खूप आनंद वाटतो.
* आपल्या आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये ‘नारी’चे महत्त्व किती आहे?
पुण्यातील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (नारी)मुळे माझा कॅनव्हास वाढला. १९९३ मध्ये या संस्थेत आलो. मी १९८९ पासून मुंबईत एड्ससंदर्भात काम करत होतो. पण नारीमध्ये आल्यानंतर कामाचा आवाका वाढत गेला. मी आज जिथे आहे, त्यामध्ये या संस्थेचा वाटा खूप मोठा आहे. मला अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठामध्ये एक वर्षासाठी ‘मास्टर्स इन पब्लिक हेल्थ’ या विषयावर प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. याचा मला खूप फायदा झाला. तिथून १९९६ मध्ये परतल्यानंतर पुढच्या वाटचालीचा दृष्टिकोन बदलत गेला. मी जिल्हा परिषद शाळेत मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेला विद्यार्थी. पण सार्वजनिक आरोग्यामध्ये जगात क्रमांक एकच्या या विद्यापीठामध्ये प्रशिक्षण घेतल्याने आपण या क्षेत्रात काय करायचे, याची दिशा मिळाली. ‘नारी’ हे माझे दुसरे घरच आहे.
* सध्याच्या एड्सवरील संशोधनाविषयी काय सांगाल?
एड्सविषयक संशोधनामध्ये सध्या खूप प्रगती झाली आहे. मी जेव्हा ‘नारी’मध्ये आलो तेव्हा आम्ही फक्त त्यांना धीर द्यायचे काम करायचो. त्यावेळी फारसे संंशोधन नव्हते. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक होते. पण आज औषधांमध्ये एड्सग्रस्त व्यक्ती पुढील काही वर्षे सर्वसामान्यांप्रमाणे आपले आयुष्य जगू शकतो. हा आजार संपूर्ण बरा होण्याचे संशोधनही सध्या सुरू आहे. या अवघड आजारावर मात करणे तितकेसे सोपे नव्हते. पण अत्यंत कमी कालावधीत एड्सवर जवळपास २८ औषधे तयार झाली. जगात अन्य कोणताच असा आजार नाही. भारताने एड्सबाबतीत जागतिक पातळीवर धोरणात्मक सहकार्य केले. पण मूळ संशोधनात, नवीन शोधण्यात आपण मागे होतो. पण आता आपल्याकडेही संशोधन होऊ लागले आहे. हा आजार पूर्णपणे घालवू शकतील, अशी औषधे शोधण्यात मात्र अद्याप यश आलेले नाही.
* साथरोग, संसर्गजन्य आजारांवरील संशोधनात आपण किती प्रगती केली आहे?
आपल्याकडे पूर्वी संशोधनाला तितकेसे महत्त्व नव्हते. हे महत्त्व आता प्राप्त झाले आहे. आता कुठेतरी आपल्याला मूळ संशोधन दिसू लागले आहे. कारण बिनपैशाचे संशोधन होऊ शकत नव्हते. संशोधनासाठी लागणारा पैसा आणि संस्कृती या दोन्हीही गोष्टी आपल्याकडे आहे. आपण निपाहचा सामना करण्यासाठी सहा महिन्यांत जगात पहिल्या क्रमांकावर होतो. सर्व जगाला आपण धक्का दिला. निपाहमध्ये एक चाचणी विकसित केली होती. चाचणी घेताना कोणत्याही व्यक्तीला त्याची लगेच लागण होऊन मृत्यूची शक्यता होती. यामध्ये एका कंपनीने विकसित केलेल्या एका चाचणीमध्ये आम्ही सुधारणा केली. त्यानुसार या चाचणीसाठीचे मशिन आम्ही कोणत्याही लहान गावात, रुग्णालयात जात होतो. जागेवरच चाचणी केली जात होती. अशा प्रकारची चाचणी आपण जगात पहिल्यांदा विकसित केली. कोरोनाच्या बाबतीतही आपण आता तयार आहोत. केरळमध्ये पहिलीच रुग्ण सापडली आहे. कोरोनाचा प्रसार झाला तरी आपण लवकरात लवकर त्यावर मात करू शकू, यादृष्टीने आपण सज्ज आहोत. यामध्ये संशोधन सुरू केले आहे. निपाहचा अनुभव आपल्या पाठिशी आहे. संशोधनामध्ये आपण कुठपर्यंतही जाऊ शकतो.
* कोरोनाबाबत जागतिक आणीबाणीमध्ये भारताची सज्जता कितपत आहे?
जागतिक पातळीवर आणीबाणी घोषित करण्यात आली असली तरी आम्ही कुठेही घाबरलेलो नाही. केरळमध्ये पहिली केस झाली आहे. पण त्याने घाबरून जाण्याची गरज नाही. आपल्या सर्व यंत्रणा सज्ज आहेत. कोरोना आजाराचे स्वरूप थोडे वेगळे आहे. हा जेव्हा वाढायला सुरू होतो, तेव्हा दरदिवशी ३० टक्के वाढ दिसते. आपल्या देशात १०६ विषाणू संशोधन प्रयोगशाळा आहेत. वेळ पडल्यास तिथे कोरोनाच्या नमुन्यांची चाचणी होईल, यासाठी सज्जता ठेवावी लागेल. पण हे करताना पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही) किती तयार आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. सध्या फक्त इथेच कोरोनाची चाचणी होत आहे. कारण अन्य प्रयोगशाळांमध्ये एक जरी चूक झाली तरी गोंधळाची स्थिती निर्माण होईल. सध्या जास्त नमुने केरळमधून येत आहेत. तिथे प्रयोगशाळा करायची असेल तर काय करावे लागेल, संशोधन कोणत्या प्रकारचे असेल, त्यातील महत्त्वाच्या बाबी कोणत्या, या सर्व गोष्टी ठरविण्यासाठी एनआयव्हीमध्ये आलो आहे. त्यानंतर सोमवारी दिल्लीमध्ये गेल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर नियोजन होईल. आतापर्यंत केंद्र सरकारने सर्व टप्प्यांवर दक्षता घेतली आहे. कोरोनाबाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांची आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणी करून त्यांच्या लक्षणानुसार रुग्णालयात भरती केले जात आहे. तिथेही सर्व काळजी घेतली जात आहे. आपल्याकडे हा विषाणू उशिरा आल्याने उपाययोजना करण्यासाठी वेळ मिळाला आहे.
* भारताच्या दृष्टीने कोरोना आजाराचे गांभीर्य किती आहे?
भारतासाठी कोरोना विषाणूचे गांभीर्य खूप आहे. आपल्याकडे लोकसंख्या खूप मोठी आहे. त्यामुळे दुसऱ्याला लागण होण्याची शक्यता अधिक आहे. पण चीनमधून आलेल्या आणि सर्दी-खोकला असलेल्या प्रवाशाने शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. कुणाच्या संपर्कात यायचे नाही. सतत मास्क घालून राहायचे. आपला हात साबणाने स्वच्छ धुवणे आवश्यक आहे. खोकताना काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. सर्व प्रकारची स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी. हे केल्यास विषाणुचा प्रसार फारसा होणार नाही. हा आजार जवळपास स्वाईन फ्लुसारखाच आहे. मृत्यूचे प्रमाण जवळपास तेवढेच आहे. मात्र, दुसऱ्याला लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे. सार्स आजारामध्ये हे प्रमाण १० टक्के, मर्समध्ये ४० टक्के होते. कोरोनामध्ये हे प्रमाण २ किंवा ३ एवढेच आहे, असे आतापर्यंतच्या मृत्यूच्या प्रमाणावरून दिसते. त्यातही ज्यांना मधुमेह इतर कुठले आजार असलेल्यांचे मृत्यूचे प्रमाण ५० टक्के आहे. त्यामुळे त्याला इतके घाबरण्याची गरज नाही.