अफगाणिस्तान पुनर्उभारणीत भारताने मदत करावी लोकमत न्यूज नेटवर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 05:15 AM2017-12-11T05:15:51+5:302017-12-11T05:16:47+5:30
अफगाणिस्तानच्या पुनर्उभारणीमध्ये भारताने प्रशासन सुधार, व्यवसाय शिक्षण, कौशल्य विकास, क्षमतावर्धन या बाबींमध्ये मदत करावी, अशी अपेक्षा अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती सरवर दानिश यांनी रविवारी मुंबईत व्यक्त केली.
मुंबई : अफगाणिस्तानच्या पुनर्उभारणीमध्ये भारताने प्रशासन सुधार, व्यवसाय शिक्षण, कौशल्य विकास, क्षमतावर्धन या बाबींमध्ये मदत करावी, अशी अपेक्षा अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती सरवर दानिश यांनी रविवारी मुंबईत व्यक्त केली.
अफगाणिस्तान आणि भारत या देशांमधील संबंधांना अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. हजारो वर्षांपासून उभय देशांमध्ये तसेच लोकांमध्ये सांस्कृतिक देवाण-घेवाण होत आहे. अलीकडच्या काळात भारत अफगाणिस्तानला माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, रस्ते बांधणी, ऊर्जा संचरण, या क्षेत्रात सहकार्य करत असून उभय देशांमधील राजकीय-आर्थिक संबंध झपाट्याने दृढ होत आहेत. अशा प्रकारे भारत आणि अफगाणिस्तानमध्ये मैत्रीसंबंधाचे नवे पर्व सुरू झाल्याबद्दलही सरवर दानिश यांनी समाधान व्यक्त केले.
भारतभेटीवर आलेल्या दानिश सरवर यांनी रविवारी (दिनांक १०) महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली, त्या वेळी ते बोलत होते. अफगाणिस्तान भारताशी आर्थिक, व्यावसायिक, राजकीय, सामरिक, सुरक्षाविषयक, सांस्कृतिक व शैक्षणिक सहकार्य वाढविण्यासाठी उत्सुक आहे. चाबहार बंदरामुळे व्यापाराला आणखी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अफगाणिस्तानातील ५००० विद्यार्थी भारतीय शिष्यवृत्तीवर महाराष्ट्रात शिक्षण घेत असून एकट्या पुणे येथे ३५०० अफगाणी विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे सांगत भारताने विद्यार्थी शिष्यवृत्तींची संख्या अधिक वाढवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अफगाणिस्तान भारतासह विविध शहरांमध्ये आगामी काळात संयुक्त सांस्कृतिक उत्सवांचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
भारताचा सच्चा मित्र - राज्यपाल
अफगाणिस्तान भारताचा सच्चा मित्र राहिला असून अफगाणिस्तानने काबुल तसेच इतर शहरांपासून थेट मुंबईसाठी विमान सेवा सुरू करावी. उभय देशांमध्ये हवाई वाहतूक तसेच चाबहार बंदराच्या माध्यमातून सागरी मार्ग सुरू झाल्यास व्यापार तसेच पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी या वेळी केले.