शत्रूवर हल्ला कसा करायचा हे भारताने अमेरिकेकडून शिकावं - उद्धव ठाकरे

By admin | Published: May 24, 2016 08:02 AM2016-05-24T08:02:17+5:302016-05-24T08:52:01+5:30

अमेरिकेने पाकिस्तानमध्ये घुसून आधी लादेन आणि आता तालिबानचा प्रमुखा या शत्रूंना संपवलं त्यातून बोध घेत भारताने पाकिस्तानला धडा शिकवावा असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला.

India should learn from how to attack enemy - Uddhav Thackeray | शत्रूवर हल्ला कसा करायचा हे भारताने अमेरिकेकडून शिकावं - उद्धव ठाकरे

शत्रूवर हल्ला कसा करायचा हे भारताने अमेरिकेकडून शिकावं - उद्धव ठाकरे

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - अमेरिकेने पाकिस्तानमध्ये घुसून तालिबानचा प्रमुख अख्तर मन्सूर याला ड्रोन हल्ल्यात ठार मारल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपा सरकारला यापासून धडा घेण्याचा सल्ला देत भारतानेही पाकिस्तानला धडा शिकूवन दाखवावाच असे आव्हान दिले आहे. अमेरिकेने लादेन व तालिबान प्रमुखाच्या बाबतीत जे केले तेच पाऊल उचलल्याशिवाय हिंदुस्थानचे भविष्य सुरक्षित राहणार नाही, असेही ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत उत्तम यश मिळाल्याचे जाहीर करत आसामसह इतरत्रही ‘उत्तम’ कामगिरी झाल्याचे त्यांचे सांगणे आहे. म्हणजे माहोल आनंदाचा व विजयाचा आहे. तेव्हा तालिबान प्रमुखाच्या हत्येचा धडा घेऊन आपण तोच आनंद हिंदुस्थानला मिळवून द्यायला हवा, असा सल्ला उद्धव यांनी दिला आहे. 
 
( हिंदू राष्ट्र संकल्पना म्हणजे भगवा दहशतवाद नाही - उद्धव ठाकरे)
 
अमेरिकेने  त्यांना नकोशा ठरलेल्या सद्दाम हुसेनला फासावर लटकवले, हिंमत दाखवत २०११ मध्ये ओसामा बिन लादेनला संपवले आणि आता तालिबानचा प्रमुख मुल्ला यालाही ठार केले आहे. अमेरिकेच्या या कारवाईचा ‘धडा’ एरवी फुशारक्या मारणार्‍या हिंदुस्थानने आतातरी घ्यायला हवा. अमेरिकेने त्यांच्या दुश्मनांचा 'पाकिस्तानात' घुसून खात्मा केला, यालाच महासत्ता म्हणतात. महासत्तेने असेच वागायचे असते, असे उद्धव यांनी म्हटले आहे.  अमेरिकेकडून आपण फक्त कर्ज, उधार्‍या किंवा संरक्षण दलाची विमाने घेतली. तेव्हा या सर्व गोष्टी विकत घेतानाच अमेरिका नावाच्या महासत्तेची परकीय मुलखात थेट घुसून दुश्मनाचा खात्मा करण्याची धडाडीसुद्धा निदान उधारीवर घेता आली तर पाहावे, असा खोचक टोमणाही उद्धव यांनी भाजपाला मारला आहे. 
( मोदी सरकार सरड्याप्रमाणे रंग बदलत आहे, उद्धव ठाकरेंची टीका) 
  •  
काय म्हटले आहे अग्रलेखात :
- अमेरिकेने जे करून दाखवले ते हिंदुस्थान कधी करणार? याचा विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. अमेरिकेने पुन्हा एकदा हिंमत दाखवली. हिच हिंमत २०११ मध्ये ओसामा बिन लादेनच्या बाबतीत दाखवली होती. तालिबानचा प्रमुख मुल्ला अख्तर मन्सूर याला अमेरिकेने आता पाकिस्तानात घुसून ठार केले आहे. ड्रोन हल्ल्यात मन्सूर मारला गेला. याआधी २०११मध्ये लादेनला असेच अमेरिकन कमांडोजनी पाकिस्तानात घुसून मारले होते. म्हणजे लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या असलेल्या लादेनला गोळ्या घातल्या आणि आता तालिबान प्रमुखास मारले. अमेरिकेच्या या कारवाईचा ‘धडा’ एरवी फुशारक्या मारणार्‍या हिंदुस्थानने आतातरी घ्यायला हवा. 
- लादेन व मुल्ला या अमेरिकेच्या दुश्मनांना पाकिस्तानात घुसून मारले, महासत्तेने असेच वागायचे असते. पाकिस्तानला काय वाटेल व पुढे कसे होईल याचा काथ्याकूट करीत मि. ओबामा बसले नाहीत. आपले पंतप्रधान मोदी आणि ओबामा हे नेहमी भेटत असतात. ओबामा सहसा कुणाला आलिंगन देत नाहीत, पण मोदी यांना ते आलिंगन देतात. हे सगळे चांगलेच आहे, पण अमेरिकेकडून आपण काय शिकलो? काय घेतले? तर फक्त कर्ज, उधार्‍या किंवा संरक्षण दलाची विमाने. तेव्हा या सर्व गोष्टी विकत घेताना अमेरिका नावाच्या महासत्तेची परकीय मुलखात थेट घुसून दुश्मनाचा खात्मा करण्याची धडाडीसुद्धा निदान उधारीवर घेता आली तर पाहावे. अमेरिकेने त्यांना नकोशा ठरलेल्या सद्दाम हुसेनला फासावर लटकवले. अमेरिकेवर हल्ला करणार्‍या लादेनला मारले व आता मुल्ला मन्सूरचा खात्मा केला. त्यालाच राष्ट्रीय सुरक्षा व राष्ट्रीय अस्मिता म्हणतात. 
- कोणीही येतो व पाठीत सुरा भोसकून जातो. तोंडावर थुंकतो. हिंदुस्थानला धडा शिकवण्याची आणि खतम करण्याची भाषा करतो. पठाणकोटच्या हल्ल्यानंतर अझर मसूद पाकिस्तानात बसून बदला घेतल्याच्या वल्गना करतो. या सगळ्याचा एक स्वतंत्र सार्वभौम देश म्हणून आपण काय प्रतिकार केला, हे जनतेला समजू द्या. शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा असतो. पण पाकिस्तानी दहशतवाद्यांना बंदुकीचीच भाषा कळते. काल मणिपुरात आसाम रायफलचे सहा जवान शहीद झाले. कश्मीरात महाराष्ट्राचा सुपुत्र पांडुरंग गावडे शहीद झाला व कश्मीर खोर्‍यात अतिरेक्यांशी चकमक सुरूच आहे. त्यात तीन पोलीस मृत झाल्याची बातमी आली आहे. त्यामुळे अमेरिकेने लादेन व तालिबान प्रमुखाच्या बाबतीत जे केले तेच पाऊल उचलल्याशिवाय हिंदुस्थानचे भविष्य सुरक्षित राहणार नाही. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत उत्तम यश मिळाल्याचे भाजपने जाहीर केले. आसाम जिंकला व इतरत्रही ‘उत्तम’ कामगिरी झाल्याचे त्यांचे सांगणे आहे. म्हणजे माहोल आनंदाचा व विजयाचा आहे. तेव्हा तालिबान प्रमुखाच्या हत्येचा धडा घेऊन आपण तोच आनंद हिंदुस्थानला मिळवून द्यायला हवा.

 

Web Title: India should learn from how to attack enemy - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.