भारत यात्रा : बाल अत्याचारविरुध्द ‘सुरक्षित बालपण...सुरक्षित भारत’ची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:36 AM2017-10-01T11:36:51+5:302017-10-01T11:37:49+5:30
नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त कैलास सत्यार्थी यांच्या नेतृत्त्वाखाली ‘भारत यात्रे’च्या स्वरुपात राष्टÑव्यापी मोर्चा ११ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. याअंतर्गत अद्याप भारत यात्रेच्या सहा गटांनी तेलंगाणा, आंध्रप्रदेश छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश आदि राज्यांमधून मार्गस्थ होत बाल शोषण व लैंगिक अत्याचाराच्या भीषण समस्येविरुध्द जनजागृती करत नागरिकांचे लक्ष वेधले
नाशिक : ‘मैं भारत को सुरक्षित बनाने के लिये, प्रयास करुंगा, किसी भी बालक, महिलाके खिलाफ अत्याचार व शोषण देखता हूं तो आवाज उठाऊं गा...’ अशी शपथ घेत शेकडो बालक व विद्यार्थी एकत्र आले. बाल अत्याचाराविरुध्द जनजागृतीच्या उद्देशाने ‘भारत यात्रा’फेरीने शहरातील रस्त्यांवरून मार्गक्रमण करत ‘सुरक्षित बालपण, सुरक्षित भारत’ची हाक नाशिककरांना दिली.
नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त कैलास सत्यार्थी यांच्या नेतृत्त्वाखाली ‘भारत यात्रे’च्या स्वरुपात राष्टÑव्यापी मोर्चा ११ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. याअंतर्गत अद्याप भारत यात्रेच्या सहा गटांनी तेलंगाणा, आंध्रप्रदेश छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश आदि राज्यांमधून मार्गस्थ होत बाल शोषण व लैंगिक अत्याचाराच्या भीषण समस्येविरुध्द जनजागृती करत नागरिकांचे लक्ष वेधले आहे. भारत यात्रेचे सहा गट देशभर प्रवास करत असून सत्यार्थी यांचे पुत्र भुवन रिभू हे स्वत: शहरात रविवारी (दि.१) भारत यात्रेच्या जथ्थ्यासह दाखल झाले.
शहरातील एन.जी.ओ. फोरमच्या विविध स्वयंसेवी संस्थांसह परिचारिका महाविद्यालयांच्या विद्यार्थिनी, महापालिका व खासगी शाळांचे विद्यार्थी ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने जमले होते. दरम्यान, रिभू यांनी उपस्थितांना बाल शोषणाविरुध्द आवाज उठविण्याची शपथ दिली. याप्रसंगी महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृह नेता दिनकर पाटील, नगरसेवक डॉ. हेमलता पाटील, सामाजिक कार्यकर्ते मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, निशिकांत पगारे आदि उपस्थित होते.
रिभू यांनी यावेळी प्रास्ताविकातून भारत यात्रा व त्यामागील उद्देश समजावून सांगितला. यानंतर मैदानावरून भारत यात्रा फेरीला प्रारंभ करण्यात आला. यात्रा ईदगाह मैदान, त्र्यंबकरोडने, अण्णा भाऊ साठे चौकातून मार्गस्थ होत शालीमार, नेहरू उद्यानामार्गे एम.जी.रोडवरून सीबीएसमार्गे ईदगाह मैदानावर सकाळी अकरा वाजता यात्रेचा समारोप करण्यात आला.