भारत येत्या पंचवीस वर्षांत सर्वच क्षेत्रांत असेल सर्वश्रेष्ठ - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 06:05 AM2023-02-19T06:05:23+5:302023-02-19T06:07:29+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून व्यक्त केला दृढ विश्वास, ईशान्येतील हिंसाचार ९० टक्क्यांनी घटला, काश्मिरात आता एकही दगड मारला जात नाही, लोकांना आवडणारे नव्हे, त्यांच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात
नागपूर - स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ते शताब्दी या अमृतकाळात ‘सर्वप्रथम भारत आणि जगात भारत सर्वप्रथम’ असा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडला आहे. त्याच्या सिद्धीसाठी १३० कोटी देशवासीयांनी ‘एक मन, एक दिशा व एक लक्ष्य’ ठरवून त्या दिशेने एकेक पाऊल टाकले तरी अशी १३० कोटी पावले पडतील आणि येत्या २५ वर्षात भारत जगात सर्व क्षेत्रांमध्ये श्रेष्ठ ठरेल, असा आशावाद केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित विशेष सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून श्री शाह बोलत होते. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, लोकमत ‘एडिटोरिअल’ बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, ‘लोकमत’चे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, कार्यकारी व संपादकीय संचालक करण दर्डा, समूह संपादक विजय बाविस्कर प्रामुख्याने उपस्थित होते.
अमृतकाळात सिद्ध करायच्या संकल्पाचा पाया गेल्या साडेआठ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घातला आहे. विविध क्षेत्रात भारत अग्रेसर होत आहे. हायड्रोजन ऊर्जा, सोलर एनर्जी, अंतराळ विज्ञान, स्टार्टअप अशा विविध क्षेत्रात भारतीय युवक जगाला हेवा वाटेल, असे काम करीत आहेत. स्वातंत्र्याच्या शताब्दीवेळी भारत जगात सर्वश्रेष्ठ होण्यास सर्वांनी अन्नाची नासाडी करणार नाही, मातापित्यांना वंदन करून घराबाहेर पडू, नियम पाळू, असे छोटेछोटे संकल्प करायला हवेत, असे आवाहन गृहमंत्री अमित शाह यांनी लोकमतच्या व्यासपीठावरून देशाला केले.
देशभरातील हिंसाचारात झाली ८० टक्के घट
गेल्या साडेआठ वर्षांच्या काळातील केंद्र सरकारच्या कामगिरीचा आढावा घेताना शाह म्हणाले, की अंतर्गत सुरक्षेबाबत काश्मीर, ईशान्य भारत व मध्य भारतातील डाव्या विद्रोहाचा टापू हे मोठे आव्हान होते. या तिन्ही प्रदेशांमधील हिंसाचार ८० टक्क्यांनी कमी झाला आहे. ३७० कलम हटविल्यानंतर काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील असे बोलले गेले. प्रत्यक्षात एक गोटाही मारला गेला नाही. गेल्या वर्षभरात १ कोटी ७० लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली. गेल्या ७० वर्षांएवढी १२ हजार कोटींची गुंतवणूक गेल्या तीन वर्षांत झाली. ईशान्य भारतातून अफस्फा हटवायला हवा, असे राहुल गांधींपासून सगळे म्हणत होते. प्रत्यक्षात तिथे निमलष्करी दलाला संरक्षण हवे अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. आता तिथला हिंसाचार ९० टक्क्यांनी कमी झाला आहे व साठ टक्क्यांहून अधिक भागात अफसोफा हटला आहे. पोलिसच तिथे स्थिती सांभाळतात. आठ हजार युवक शस्त्रे टाकून मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. माओवाद्यांचे उच्चाटन होत आहे. पूर्वी १६० जिल्हे नक्षलग्रस्त होते. आता जुन्या रचनेतील केवळ २२ जिल्ह्यांत माओवादी सक्रिय आहेत. बिहार, झारखंड, मध्य प्रदेश व महाराष्ट्र जवळपास नक्षलमुक्त झाले असून उरलेल्या भागातही भारत विजयी होईल, असे गृहमंत्री म्हणाले.
लोकमतचे संस्थापक जवाहरलाल दर्डानी उत्कृष्ट व दूरदर्शी पत्रकारितेचा आदर्श दिला. नागपूर येथे दर्डाजींच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या जीवनावर आधारित 'बाबूजी' या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
— Amit Shah (@AmitShah) February 18, 2023
'लोकमत नागपूर आवृत्ती'च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त टपाल तिकीट व सुवर्ण चलनाचे प्रकाशन झाले. pic.twitter.com/6ceZcAnyRi
सत्व, साहस व सातत्य हीच ‘लोकमत’च्या यशाची त्रिसूत्री : गृहमंत्री अमित शाह
पन्नास वर्षांच्या मोठ्या कालखंडात पत्रकारितेच्या धर्माचे पालन करताना, लोकप्रियता मिळविताना व्यावसायिक यश मिळविणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि लोकमतने ती सत्व, साहस व सातत्य या त्रिसूत्रींच्या बळावर साधली आहे, असे गौरवोद्गार गृहमंत्री अमित शाह यांनी या सोहळ्यात काढले, तर लोकमत हे समाजातल्या सर्वांना आपलेसे वाटणारे वृत्तपत्र असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भूमिका घेण्याचे क्षण साधले... म्हणून बाबूजी महान
आपण स्वत:ही आयुष्यभर जपलेली मूल्ये, सिद्धांत यापैकी एकाची निवड करण्याचे, भूमिका घेण्याचे क्षण मोजके असतात. अशावेळी मूल्यांची जपणूक करणारी भूमिका घेणे ज्यांना साधते ती माणसे महान असतात. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा हे अशा थोर व्यक्तींपैकी एक आहेत, अशा शब्दात गृहमंत्री अमित शाह यांनी बाबूजींना अभिवादन केले.
कधीही व्होटबँकेचे राजकारण नाही
स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या, आयुष्य पणाला लावणाऱ्या सेनानींनी पाहिलेल्या स्वतंत्र सर्वश्रेष्ठ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधानांनी साद घातली. कोरोना महामारीविरोधातील जनतेची लढाई, जनता कर्फ्यू हा जगाला अचंबा होता. लालबहादूर शास्त्रींच्या शनिवारी भात खाऊ नका या आवाहनानंतर मोदींच्या आवाहनाला जनतेने दिलेला प्रतिसादाचा हा दुसराच प्रसंग.
८० कोटी जनतेला दोन वर्षे मोफत अन्नधान्यासाठी मोदींनी गुदामाचे दरवाजे खुले केले, हादेखील पाश्चात्त्य जगातील विद्वानांना धक्का होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशाची आरोग्यव्यवस्था सांभाळून लोकांचे जीव वाचविले. ऑक्सिजनची दहापटींनी वाढलेली मागणी पूर्ण केली. सगळी हॉस्पिटल्स ऑक्सिजनबाबत आत्मनिर्भर आहेत. अन्य देश मंदीच्या लाटेत पण भारत योग्य अर्थनीतीमुळे प्रगतीच्या वाटेवर आहे. भाजप कधीही व्होटबँकेचे राजकारण करीत नाही. काही कटू निर्णयही घ्यावे लागले. कारण, लोकांना आवडणारे नव्हे तर त्यांच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात, असेही शाह म्हणाले.
निर्णय घेणाऱ्या अमितभाईंमध्ये दिसते सरदार वल्लभभाई यांची छबी : विजय दर्डा
राष्ट्रहितासाठी धाडसी निर्णय घेणारे गृहमंत्री अमित शाह यांच्यात आपल्याला लोहपुरूष सरदार वल्लभभाईंची छबी दिसते, अशा शब्दांत ‘लोकमत’ एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी गृहमंत्री अमित शाह यांचा स्वागतपर भाषणात गौरव केला. गृहमंत्री शाह हे राष्ट्रप्रहरी आहेत. त्यांनी राष्ट्रहिताचे अनेक धाडसी निर्णय घेतले. ते घेणे सोपे नव्हते. त्यासाठी जिगर लागते, असेही ते म्हणाले.
‘लोकमत’ समाजातील सर्वांना आपलं वाटणारं वृत्तपत्र : देवेंद्र फडणवीस
‘लोकमत’ आपल्याला नेहमी काळाच्या पुढे असल्याचे पाहायला मिळाले. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल सर्व प्रकारच्या माध्यमांतून जनतेपर्यंत ‘लोकमत’ पोहोचला. ‘लोकमत’मध्ये काम करणारी तिसरी पिढी आज तयार झाली आहे. बाबूजींनी सुरू केलेली परंपरा अविरत सुरू राहावी यासाठी ‘लोकमत’ची नवीन पिढीदेखील त्याच सिद्धांतावर काम करत आहे, असे फडणवीस म्हणाले.