शेजारील शत्रुराष्ट्रांमुळेच भारत शस्त्रसज्ज
By admin | Published: January 10, 2015 01:25 AM2015-01-10T01:25:13+5:302015-01-10T01:25:13+5:30
भारत हे शांतताप्रिय राष्ट्र आहे, तथापि, शेजारील काही शत्रुराष्ट्रांमुळे भारताला शस्त्रसज्ज राहावे लागत आहे.
नाशिक : भारत हे शांतताप्रिय राष्ट्र आहे, तथापि, शेजारील काही शत्रुराष्ट्रांमुळे भारताला शस्त्रसज्ज राहावे लागत आहे. त्यामुळे अशा मित्रत्व न बाळगणाऱ्या राष्ट्रांमुळेच शस्त्रांस्त्रांची गरज कायम राहणार आहे, असे प्रतिपादन देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले.
ओझरच्या हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड (एचएएलच्या) कारखान्यात सुखोई या लढाऊ विमानांच्या निर्मितीचा पहिला १५० विमान निर्मितीचा टप्पा पार पडला. त्याचवेळी विशिष्ट कालावधीनंतर सुखोई विमानांची देखभाल दुरुस्तीसह पुनर्बांधणी करून ते पुन्हा हवाईदलाला सुपूर्द करण्याचा सोहळा शुक्रवारी ओझर येथे झाला. एचएएलचे अध्यक्ष डॉ. त्यागी यांनी पुनर्बांधणी केलेले दुसरे सुखोई विमान हवाई दलाच्या ताफ्यात सामील करण्यासाठी सज्ज होत आहे, असे सांगितले. नाशिक, कोरापत, लखनौ, कोरवा आणि हैदराबाद यांचा सुखोईच्या निर्मिती आणि पुनर्बांधणीत सहभाग आहे.
सुखोई-३० एमकेआय, एसबी०२७ तसेच नव्याने निर्मित केलेले १५० वे सुखाई ३० एमकेआय हे लढाऊ विमान संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते हवाई दलाला सुपूर्द करण्यात आले. हवाई दलप्रमुख अरूप रहा, एचएएलचे सह संचालक के. के. पंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सुखाई विमानांच्या पुनर्बांधणीसाठी रशियाचे सहकार्य आहे. रशियाने त्यासाठीची कागदपत्रे दिली आहेत. सुखोई विमांनची देखभाल दुरूस्तीसह पुनर्बांधणी करण्यासाठी ओझर येथील कारखान्यात दहा नवीन शॉप सुरू करणे प्रस्तावित आहे, अशी माहिती एचएएलचे अध्यक्ष डॉ. त्यागी यांनी दिली.