भारतीय अंडीभक्षक सापांचे विदर्भात अस्तित्व
By admin | Published: April 24, 2016 02:35 AM2016-04-24T02:35:20+5:302016-04-24T02:35:20+5:30
दुर्मिळ समजला जाणारा भारतीय अंडीभक्षक साप जगातून नष्ट झाला, असे मानण्यात येत होते; परंतु वर्धेतील सर्पमित्र पराग दांडगे यांनी या सापाचे विदर्भात अस्तित्त्व असल्याचा
वर्धा : दुर्मिळ समजला जाणारा भारतीय अंडीभक्षक साप जगातून नष्ट झाला, असे मानण्यात येत होते; परंतु वर्धेतील सर्पमित्र पराग दांडगे यांनी या सापाचे विदर्भात अस्तित्त्व असल्याचा शोधनिबंध १४ एप्रिल २०१६ रोजी ‘रशियन जर्नल आॅफ हर्पेटोलॉजी’ या शोधपत्रिकेत सादर केला. भारतीय अंडीभक्षक सापाचा वावर महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये असून यातील आठ जिल्हे विदर्भातील असल्याचे त्यांनी शोधनिबंधात सप्रमाण सिद्ध केले आहे.
१०० वर्षांहून अधिक काळापूर्वी अस्तित्त्वात असलेल्या या अंडीभक्षक सापाचा वर्धा येथीलपराग दांडगे यांनी २००३ साली पुनर्शोध लावला. एवढेच नव्हे तर या नष्टप्राय सापाचे अस्तित्व विदर्भात असल्याचे सांगत विदर्भ हा भारतीय अंडीमक्षक सापांचा महत्त्वाचा आधिवास असल्याचेही सिद्ध केले आहे.
यासंदर्भातील शोध निबंध पराग दांडगे आणि आशिष टिपले या दोघांनी तयार केला होता. त्यांच्या या शोधनिबंधाला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आहे.
भारतीय अंडीभक्षक साप हा फक्त बया, मुनिया, सामान्य चिमणी, पारवा, होला अशा काही नेमक्या पक्ष्यांची अंडी खातो. त्याच्या
अंडी गिळण्याच्या विशिष्ट पद्धतीचा अभ्यास करून निसर्गातील
या पक्ष्यांच्या संख्येवर नियंत्रण
ठेऊन किती महत्त्वाचे कार्य
करतोय, याविषयीचा दांडगे यांचा शोधनिबंध २००८ मध्ये ‘हम्याद्र्याद’ नावाच्या शोधपत्रिकेत प्रकाशित झाला होता.
नव्याने १४ एप्रिल २०१६ रोजी प्रसिध्द झालेल्या शोधनिबंधात दांडगे व टिपले यांनी अंडीभक्षक सापाबद्दलची नवीन काही तथ्ये मांडली आहेत. दांडगे यांनी अभ्यासलेल्या ६६ अंडीभक्षक सापांपैकी ४० साप रस्त्यांवर वाहनाखाली चिरडून ठार झाल्याची नोंद केलीआहे. (प्रतिनिधी)
वाघाच्या सूचीत
येणारा वन्यजीव
भारतीय अंडीभक्षक साप केवळ पक्ष्यांची अंडी खाऊनच आपली उपजीविका चालवितो. हा साप वन्यजीव संवर्धन अधिनियम १९७२ नुसार अनुसूची-१ म्हणजेच वाघ असलेल्या सूचीमध्ये समाविष्ट आहे.
अंडीभक्षक साप नामशेष होण्याची भीती
विदर्भ हा भारतीय अंडीभक्षक सापाचा महत्त्वाचा अधिवास असून विदर्भातील शेकडो एकर झुडपी जंगले आज अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. झुडपी जंगले संपुष्टात येत असल्यानेच पक्ष्यांचे अधिवास संपुष्टात येत आहे. त्यांच्या अंड्यांवर गुजराण करणारा अंडीभक्षक साप पुन्हा एकदा काळाच्या पडद्याआड जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
या अनोख्या व विशेष सापाच्या संवर्धनाची व अध्ययनाची गरज आहे. सर्वत्र व्याघ्र संरक्षण व संवर्धनाला ऊत आला आहे. असे असताना या सरीसृपांकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यांच्या सवर्धनाकरिता कोणीच पुढे येत नाही, याचीच खंत.
- पराग दांडगे,
बहार नेचर फाउंडेशन, वर्धा