राज्यघटनेचा अभ्यासक म्हणून संपूर्ण परिस्थिती पाहून वाईट वाटतं- उल्हास बापट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 01:54 PM2022-06-29T13:54:19+5:302022-06-29T13:56:32+5:30
राज्यपालांनी बहुमत चाचणीचे पत्र पाठवल्यानंतर व्यक्त केलं मत
Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडी विरूद्ध शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गट यांच्यातील सत्तासंघर्ष आता अधिकच तीव्र झाला आहे. आमदारांनी सातत्याने मागणी करूनही शिवसेना मविआ सरकारमधून बाहेर पडली नाही. त्यामुळे शिंदे गट मुंबईत परतला नाही. अखेर मंगळवारी विरोधी पक्ष आणि अपक्ष आमदारांनी मविआकडे बहुमत नसल्याचा दावा केला. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्याच बहुमत चाचणीला सामोरं जाण्यास सांगितलं. याबाबत बोलताना राज्यघटनेचे अभ्यासक उल्हास बापट यांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली.
सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान, राज्यातील राजकारणाची परिस्थिती 'जैसे थे' (Status Quo) ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ११ जुलैला पुढील सुनावणीपर्यंत हे आदेश देण्यात आले आहेत. असे असताना राज्यपालांकडून बहुमत चाचणीबाबत पत्र दिलं जाणं याबाबत उल्हास बापट यांनी आपले मत व्यक्त केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहे. राज्यपाल पदाचा गैरवापर होत असल्याचे दिसत आहे. राज्यपालांनी मुख्यमत्र्यांच्या सूचनेनुसार वागावे असे सांगितले जाते. त्यामुळे सत्र बोलावणे आणि सत्र संपवणे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानेच व्हायला हवे. त्यामुळे उद्या बोलावलेले अधिवेशन घटनाबाह्य आहे. राज्यघटनेचा अभ्यासक म्हणून ही संपूर्ण परिस्थिती पाहिली की वाईट वाटतं, असे उल्हास बापट म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याविषयी पत्र पाठवले. विधीमंडळातील बहुमत चाचणी विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे. राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. तसेच शिवसेनेतील बंडखोर आमदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्या मुंबईत पोहोचणार असल्याची माहिती स्वत: एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर सुप्रीम कोर्टात आज काय निकाल येतो हे पाहण महत्वाचं आहे, असेही उल्हास बापट यांनी सांगितले आहे.