दुष्काळमुक्तीसाठी सरसावली भारतीय जैन संघटना
By admin | Published: May 16, 2017 02:21 AM2017-05-16T02:21:11+5:302017-05-16T02:21:11+5:30
भारतीय जैन संघटनेने आता राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी गावेच्या गावे पिंजून काढायला सुरुवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भारतीय जैन संघटनेने आता राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी गावेच्या गावे पिंजून काढायला सुरुवात केली आहे. संघटनेचे कार्यकर्ते १३ जिल्ह्यांमधील ३० तालुक्यांत गावकऱ्यांच्या मदतीने थेट श्रमदानात सहभागी झाले आहेत.
अभिनेता अमीर खान यांनी ‘पानी फाउंडेशन’च्या माध्यमातून गतवर्षीपासून गावपातळीवर वॉटरकप स्पर्धा राबविण्यास सुरुवात
केली आहे. या स्पर्धेंतर्गत ६६७ गावांतील नागरिक यंदाच्या पावसाळ्यात वाहून जाणारे
पाणी त्यांच्या शिवारात मुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणात श्रमदान
करीत आहेत. या श्रमदानाला
अधिक बळ मिळावे, यासाठी भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथ्था, राज्य समितीचे सुदर्शन जैन यांनी २८५ जेसीबी, पोकलँड मशिन देऊन भरीव सहकार्य केले आहे.
गावपातळीवर सुरू झालेल्या श्रमदानातून जलसंधारणाच्या कामांनी वेग घेतला आहे. गावकऱ्यांनी मागणी केल्यास अधिक यंत्र उपलब्ध करून दिले जातील, असे शांतीलाल मुथ्था यांनी सांगितल्याने, गावकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. राज्यावर आलेले दुष्काळाचे संकट दूर करणे केवळ शासनाचे कर्तव्य नसून, सामाजिक दायित्व म्हणून जैन संघटना पुढे सरसावल्याचे शांतीलाल मुथ्था यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
राज्यात एकाच वेळी २८५ जेसीबी, पोकलँडद्वारे जलसंधारणाची कामे होत आहेत. यात गावकऱ्यांचे श्रमदान लाखमोलाचे ठरत आहे. सामूहिक प्रयत्नाने नक्कीच राज्य दुष्काळमुक्त होईल.
- सुदर्शन जैन, राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जैन संघटना