वॉटर कप स्पर्धेत भारतीय जैन संघटनेचे भरीव योगदान
By admin | Published: May 28, 2017 01:02 AM2017-05-28T01:02:45+5:302017-05-28T01:02:45+5:30
आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनने महाराष्ट्रात घेतलेल्या वॉटर कप स्पर्धेत भारतीय जैन संघटनेने ४९० पोकलेन आणि जेसीबी मशिनच्या साहाय्याने ३३६ गावे पाणीदार बनविण्यात
- लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनने महाराष्ट्रात घेतलेल्या वॉटर कप स्पर्धेत भारतीय जैन संघटनेने ४९० पोकलेन आणि जेसीबी मशिनच्या साहाय्याने ३३६ गावे पाणीदार बनविण्यात भरीव योगदान दिले आहे. एकाच वेळी विविध गावांत या यंत्रांची गरज भागविताना भारतीय जैन संघटनेला आपला आपत्ती निवारण काळातील अनुभव उपयोगाला आला, अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत दिली.
या वर्षी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत ३० तालुक्यांतील गावांचा समावेश होता. भारतीय जैन संघटनेने या स्पर्धेत श्रमदानाचा टप्पा पूर्ण करणाऱ्या सर्व गावांतील कठीण कामे जेसीबी आणि पोकलेनच्या माध्यमातून करून देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. यासाठी ३० तालुक्यांत ४२ लोकांच्या नियुक्त्या करून सर्व सरपंचांशी व गावकऱ्यांशी संपर्क करण्याची यंत्रणा उभी केली होती. तसेच प्रत्येक जिल्ह्यात भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या समित्याही नियुक्त केल्या होत्या. एक वेगळे सॉफ्टवेअर बनवून काम करण्यास सुरुवात करण्यात आली.
अनेक अडीअडचणींचा सामना करीत स्पर्धा संपण्याच्या दिवसापर्यंत जेसीबीने एकूण २७१ आणि २१९ पोकलेनद्वारे ३३६ गावांत मोठ्या प्रमाणावर कामे केली. सुरुवातीला एका गावाला २५० तास जेसीबी आणि १०० तास पोकलेन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
प्रत्यक्ष सरपंचांच्या बैठकीमध्ये सर्वच गावांची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्याने अनेक गावांना वेळ आणि मशिन्स वाढवून द्यावे लागले, असेही केतन शहा यांनी सांगितले. या वेळी श्याम पाटील, अमोल हांडगे, वालचंद पाटील, राकेश हेरलगे, अभिनंदन विभुते, संजय लोंढे, वर्षा जैन, संजय भस्मे, माया पाटील, अरुण नानर, पंकजा पंडित आदी उपस्थित होते.
मध्य प्रदेशातून मागविण्यात
आल्या जेसीबी...
एप्रिल व मे या कालावधीत जेसीबी व पोकलेनसारख्या मशिन्स मिळविणे अवघड होते. मराठवाड्यात बीड, उस्मानाबाद येथे त्रास झाला. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या आदिवासी भागात मशिन उपलब्ध होत नव्हते. गरज लक्षात घेऊन मध्य प्रदेशातील खांडवा भागातून जेसीबी आणि पोकलेन आणून आदिवासी परिसरात दुष्काळाची कामे करून देण्यात आली.
मागास व दुर्गम
गावांना डिझेलसह मशिन्स दिल्या...
शांतिलाल मुथा आणि प्रफुल्ल पारख यांच्या दौऱ्यात काही गावांचे लोक डिझेलचे पैसे देण्यास असमर्थता व्यक्त करीत होते. आमीर खान यांनी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील चारमोळी गावाला भेट दिली असता त्या गावातील वृद्ध महिलांनी मासिक पेन्शनमधून ५00 रुपये डिझेलसाठी आमीर खान यांच्यासमोर देऊ केले होते.
त्यामुळे आमीर खानने अशा गावांची यादी गोळा करून शांतिलाल मुथ्था यांच्यासोबत गावांना डिझेलसह मशिन देण्याबाबत चर्चा केली. त्यानुसार भारतीय जैन संघटनेने ३१ गावांना ३६ मशिन्स डिझेलसह पुरविल्या आहेत, अशी माहिती या वेळी केतनभाई शहा यांनी दिली.