भारतीय लोक नुसते बोलबच्चन; राज्यपालांनी व्यक्त केली खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 03:52 PM2019-12-26T15:52:17+5:302019-12-26T15:57:23+5:30
१३0 कोटीच्या देशात येतात फक्त ३ ते ४ पदकं; सोलापूर विद्यापीठात राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाला प्रारंभ
सोलापूर : १३० कोटी जनता असलेल्या भारतीय लोक जेव्हा आॅलम्पिक स्पर्धेत भाग घेतात तेथे मात्र दोन ते तीन पदकं मिळवितात, पण एखादी वक्तृत्व स्पर्धा ठेवली तर भारतीय व्यक्ती पुढे असते़ यामुळे भारतीय लोकांनी बोलबच्चनपणा सोडून खेलाडूवृत्ती जोपासावी़ जागतिक पातळीवर खेळ क्षेत्रात देशाला पुढे घेऊन जावे असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूरविद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय तेविसावी आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी प्र कुलगुरू डॉ. विकास कदम, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी क्रीडा विभागाचे संचालक डॉ. सुरेश पवार यांनी स्वागत व प्रस्ताविक केले.
पुढे बोलताना राज्यपाल म्हणाले की, खेळात एक वेगळी ऊर्जा आहे. खेळामुळे शरीर स्वास्थ्य उत्तम राहते. दुदैर्वाने खेळ क्षेत्रात भारत मागे आहे. आॅलम्पिकमध्ये भारताला पदक कमी मिळतात. त्यामुळे युवा खेळाडूंनी सराव तसेच परिश्रम करत आपली ऊर्जा खर्ची घालत जागतिक पातळीवर खेळ क्षेत्रात देशाला पुढे घेऊन जावे, खेळात व आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी लक्ष्य केंद्रित करणे आवश्यक आहे. परिश्रमही खूप महत्त्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी व शरीर स्वास्थ्य उत्तम ठेवण्याकरिता योग आणि ध्यान करणे गरजेचे आहे. यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्त्व विशद करून जागतिक पातळीवर २१ जून रोजी योग दिन साजरा करण्यास सुरुवात केली. विद्यार्थी खेळाडूंनीही नियमित योग व ध्यान करावे, असे आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी केले.
कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी क्रीडा महोत्सवाची माहिती दिली. विद्यापीठाकडे एकही क्रीडांगण उपलब्ध नसताना आज विद्यापीठाने विविध १५ क्रीडांगणे आंतरराष्ट्रीय दर्जाची तयार केली आहेत. यासाठी जिल्ह्यातील देणगीदारांनी मोठी मदत केली आहे. सीएसआर फंडातून काही क्रीडांगणे साकारली आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आता क्रीडा महोत्सवातील सर्व खेळाडू विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आरोग्य पुस्तिका दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या महोत्सवासाठी माजी विद्यार्थ्यांचेही आॅनलाइन नोंदणीसाठी सहकार्य लाभल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले.
प्रारंभी २० विद्यापीठाच्या संघांचे मार्च पास झाले. क्रीडा ज्योतीचे स्वागत करण्यात आले. ३० डिसेंबरपर्यंत चालणाºया या क्रीडा महोत्सवात साडेतीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली व प्रा. रेवा कुलकर्णी यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी मानले.