इंडियन ‘रिओ’लिटी शो

By admin | Published: August 28, 2016 03:05 AM2016-08-28T03:05:46+5:302016-08-28T03:05:46+5:30

विविध वाहिन्यांवरचे ‘रिअ‍ॅलिटी शो’ पाहून आणि तिथल्या तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया पाहून कधी-कधी वाटते की, जगातले सगळे ‘टॅलेंट’ भारतीय मुला-मुलींकडे ठासून भरले आहे. मग आॅलिम्पिकमध्ये

Indian 'RioLitie Show' | इंडियन ‘रिओ’लिटी शो

इंडियन ‘रिओ’लिटी शो

Next

- विनायक पात्रुडकर

विविध वाहिन्यांवरचे ‘रिअ‍ॅलिटी शो’ पाहून आणि तिथल्या तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया पाहून कधी-कधी वाटते की, जगातले सगळे ‘टॅलेंट’ भारतीय मुला-मुलींकडे ठासून भरले आहे. मग आॅलिम्पिकमध्ये आपण इतके मागे का? हा प्रश्न अनुत्तरित राहतोच.

इंडियाज गॉट टॅलेंट, खतरों के खिलाडी अशा नावाने चालणाऱ्या रिअ‍ॅलिटी शोमुळे वाहिन्यांचा ‘टीआरपी’ शिगेला पोहोचला होता. अशा शोमुळे वाहिन्यांचे उखळ पांढरे झाले. गेल्या १०-१२ वर्षांत असे कितीतरी शो झाले. शेकडो नव्हे, हजारोंच्या संख्येने असलेले हे ‘टॅलेंट’ देशाला दिसले. शो मध्ये असलेल्या ‘जज’नी तर अनेक मुला-मुलींवर प्रचंड कौतुकाचा वर्षाव करीत जगात तू या देशाचे नाव काढशील, असे जाहीर आशीर्वाद दिले. मुलांचा उत्साह त्यामुळे दुणावला. चमचमत्या आणि झगमगत्या दुनियेत तेही हरवून गेले. रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसणारी शारीरिक चपळता, त्यांच्यातले अ‍ॅथेलिट कसब खरोखर वाखाणण्याजोगे असते, यात शंकाही नाही.
या रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर केलेली कसरत अनेकांच्या भुवया उंचावणारी, तोंडात बोटे घालावयास लावणारी असते. त्यासाठी सहभागी तरुण-तरुणी केवढी तरी मेहनत घेत असतात. त्यांच्या मेहनतीच्या, कष्टाच्या कहाण्याही या छोट्या पडद्यावर दाखविल्या जातात. देशाच्या काना-कोपऱ्यात लपलेले हे ‘टॅलेंट’ आम्ही कसे शोधून जगापुढे आणले, असा वाहिन्यांचा ऊर बडवलेला सूरअसतो. अर्थात, हेही कौतुकास्पद आहेच. त्यांना ज्या पद्धतीने सादर केले जाते, त्यावरून असे वाटते की, आयुष्यभराच्या कष्टाचे चीज झाले, पण हे ‘टॅलेंट’ पुढे जाते कुठे? हा यक्षप्रश्न मात्र सतावणारा असतो. नाच-गाणी यांच्या रिअ‍ॅलिटी शोचे ठीक आहे. ते कुठेतरी हे ‘टॅलेंट’ वापरून मस्त जगतात, पण शारीरिक मेहनती करून ‘शो’ जिंकलेले पुढे कुठे जातात? की केवळ ‘शो’ जिंकण्यापुरती ती मेहनत असते. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ हा शो तर ‘अमेरिका गॉट टॅलेंट’या शोची नक्कल करणारा आहे. ज्या अमेरिकेत हा शो प्रचंड लोकप्रिय झाला, त्या देशाने आॅलिम्पिकमध्येही पहिल्या क्रमांकाची ‘मेडल्स’ मिळविली. त्यांच्या रिअ‍ॅलिटी शोची नक्कल करणाऱ्या, तो शो डोक्यावर घेणाऱ्या भारतीयांची पदक संख्या यंदा केवळ दोन? ‘रिओ’ आॅलिम्पिकनंतर देशाच्या क्रीडा संस्कृतीवर खूप चर्चा झाली. ती किती गांभीर्याने झाली, त्याचे किती पडसाद आगामी टोकीयोच्या आॅलिम्पिकमध्ये पडतील, हा संशोधनाचा विषय ठरेल. यंदाच्या आॅलिम्पिकनंतर हैदराबाद आणि रोहतक ही दोनच शहरे चमकून उठली. काही प्रमाणात दीप करमाकर आणि आपल्या ललिता बाबरनेही आशादायी वातावरण जिवंत ठेवले. ज्या खेळाडूंनी यशाच्या रेषेपर्यंत धाव घेतली, त्याच्या कौतुकाचा विषयच नाही. ते केले तरच पुढची पिढी आॅलिम्पिकसाठी तयार होईल. आपल्याकडे २२ सुवर्ण मिळविणारा मायकेल फेप्ल्स किंवा धावण्यात सर्वाधिक सुवर्ण मिळविणारा उसेन बोल्ट कदाचित तयार होणार नाही, पण पी.व्ही.सिंधूसारख्या लढणाऱ्या रणरागिणी नक्कीच तयार होऊ शकतील. त्यासाठी कितीतरी व्यापक, वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न आतापासूनच सुरू व्हायला हवेत, पण तसे होताना दिसेल, याची शाश्वती नाही. आपल्याला दोन-चार महिन्याच्या कष्टावर यशाच्या शिखरावर पोहोचणारे रिअ‍ॅलिटी शो हवे आहेत. सतत मेहनत, अपार जिद्द आणि चिकाटीचे फळ असणारे आॅलिम्पिक शो नको आहेत. जलतरण पटू मायकेल फेप्ल्सने सलग चौथ्यांदा आॅलिम्पिकमध्ये सहभाग घेत विक्रमी सुवर्णाची नोंद केली. तशी स्थिती यायला कदाचित वेळ लागेल, पण यात अवघड आणि अशक्य असे काही नाही, हा विचार बळावायला हवा. एकीकडे आपण महासत्ता होण्याची भाषा करीत असताना, सर्वोच्च क्रीडा स्पर्धेतील आपले मर्यादित यश, आपल्याला अजून बराच टप्पा गाठायचा आहे, याची जाणीव करून देणारे असते.
परवा दहीहंडीवर मर्यादा घालताना सर्वोच्च न्यायालयानेही दहीहंडीने आॅलिम्पिकमध्ये पदक मिळविले का? असा सवाल युक्तीवादावेळी उपस्थित केला होता. आपल्या बहाद्दर (?) गोविंदांनी मर्यादेचा आदेशच पायदळी तुडविला. दहीहंडीचे नऊ थर लावून मर्यादेच्या आदेशाचे उल्लंघन केले. ही बंडखोर वृत्ती मग आॅलिम्पिकसारख्या खेळात का नाही? कोर्टाने हेच तर विचारले होते. तुम्हाला शारीरिक कसब दाखवायचे, तर ते आॅलिम्पिकच्या मैदानावर दाखवा ना? पण हे सगळे गोविंदा जन्माष्टमीनंतर वर्षभर कुठे गायब होतात? असे प्रश्न मनाला वेदना देणारे असतात. आपल्याला कोर्टाच्या आदेशाचा भंग करण्यातच आनंद मिळतो. आॅलिम्पिकमधील पदकाचा आनंद त्याच्या कितीतरी पट अधिक असतो, पण त्यामागची अपार मेहनत करण्याची ना शारीरिक तयारी असते, ना मानसिक तयारी. भारतीय क्रीडा संस्कृतीचे हे भीषण वास्तव आहे.
चीन असो वा इतर युरोपीय देशांनी ज्या पद्धतीने क्रीडा संस्कृती रुजविली, जोपासली, समृद्ध केली, त्याची नक्कल जरी केली, तरी कितीतरी क्रीडापटू तयार होतील, पण आपल्याला त्यांच्या ‘रिअ‍ॅलिटी शो’ची नक्कल करून टीआरपीचा धंदा करण्यात जास्त रस आहे. देशात क्रीडापटू तयार करणे, ही जबाबदारी आपली नाही, ही वृत्तीदेखील कारणभूत आहे, पण हे कडवे सत्य पचवायची ताकदही नाही.
आपल्याला दुसऱ्यावर चिखलफेक करायला, टीका करायला आवडते, पण टीकेचा रोष स्वत:कडे आला की, आपण अस्वस्थ होतो. सुधारणेसाठी होणारी टीका खिलाडू वृत्तीने स्वीकारण्याची मानसिकता नसल्यामुळेच
खेळाडू तयार करण्यात आपण अपयशी ठरतो आहोत.
भारतरत्न सचिन तेंडुलकरनेही कोणाची टीका किती गांभीर्याने घ्यायची, याचे तंत्र आत्मसात केले होते. त्याने तसे एकदा बोलूनही दाखविले होते. त्यामुळेच तर तो यशाचे शिखर गाठू शकला. आपल्याला नव्या दिशेने वाटचाल करणाऱ्या, देशातील नवी पिढी आमूलाग्र पद्धतीने बदल घडविणाऱ्या नव्या क्रीडा संस्कृतीची नव्हे, एका नव्या क्रीडा चळवळीची गरज आहे. त्यासाठी क्रीडा विचारांचे बाळकडू प्यायची तयारीही हवी, तरच आॅलिम्पिकचा पदक दुष्काळ संपेल.

(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत.)

Web Title: Indian 'RioLitie Show'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.