भारतीय हाच प्रत्येकाचा समाजधर्म असावा- फादर फ्रान्सिस दिब्रिटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 02:32 AM2019-09-25T02:32:54+5:302019-09-25T02:33:04+5:30

महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे प्रतिगामी शक्तींमुळे आपली वाटचाल मागच्या दिशेने होणार असेल, तर प्रगती कशी साधली जाणार?

Indian should be the religion of everyone - Father Francis Dibrito | भारतीय हाच प्रत्येकाचा समाजधर्म असावा- फादर फ्रान्सिस दिब्रिटो

भारतीय हाच प्रत्येकाचा समाजधर्म असावा- फादर फ्रान्सिस दिब्रिटो

Next

आपल्या देशात निरक्षरता हा प्रश्न आ वासून उभा आहे. महाराष्ट्रातील अनेक खेड्या-पाड्यापर्यंत आजही आरोग्य सुविधा पोहोचलेल्या नाहीत. आरोग्य माणसाच्या मुलभूत गरजांपैकी एक असल्याने त्याकडे शासनाने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. शुद्ध पाणी हीसुद्धा मुलभूत गरज आहे. भविष्यात पाण्याचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होणार आहे. त्यामुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ यांसारख्या योजनांमध्ये शासनाप्रमाणेच लोकसहभागही असायला हवा. शासनाची धोरणे स्पष्ट आणि सुलभ असतील तर नागरिकही त्यामध्ये सहभागी होऊ शकतील. समाजातील श्रीमंत-गरीब ही दरी दिवसेंदिवस वाढत आहे. एखादी व्यक्ती वर्षाला ५-१० लाख रुपये कमावते, तर दुसरीकडे मजुराला रोजचा उदरनिर्वाह होईल एवढाही रोजगार मिळत नाही. ही विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. सध्या देश आर्थिक मंदी, बेरोजगारी अशा समस्यांचाही सामना करतो आहे. महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे प्रतिगामी शक्तींमुळे आपली वाटचाल मागच्या दिशेने होणार असेल, तर प्रगती कशी साधली जाणार? अधोगती झाल्यास पुढील पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. तरुणाईला सकारात्मक दिशा देण्यासाठी आपण सर्वांनी एकवटले पाहिजे.

धार्मिक सहिष्णुता हा भारतीय संस्कृतीचा वारसा आहे. त्यामुळे गेल्या काही काळामध्ये सहिष्णुतेवर हल्ला करणाऱ्या घटनांमध्ये झालेली वाढ ही चिंतेची बाब आहे. भारतीय संविधानाने प्रत्येकाला काही हक्क आणि अधिकार दिले आहेत. नागरिकांच्या स्वातंत्र्यावर बाधा आणण्याचा अधिकार कोणालाही नाही. घटनेने आपल्यासमोर मोठे आणि उदात्त स्वप्न ठेवले आहे आणि सर्व भारतीयांना मिळून ते पूर्ण करायचे आहे. त्यामुळे देशात, राज्यात घडणारी प्रत्येक कृती ही संविधानातील मुल्यांना अनुसरुनच असली पाहिजे. धर्म हा वैयक्तिक साधनेचा मार्ग असतो. मात्र, सार्वजनिक जीवनात भारतीय हा एकच धर्म आहे. माणुसकी हे समाजाच्या जीवनाचे मूल्य असले पाहिजे. ख्रिश्चन हा माझा साधनेचा धर्म असला तरी भारतीय हा माझा समाजधर्म आहे. प्रत्येकाने त्यादृष्टीने विचार करायला हवा.

सध्या सभोवतालचे वातावरण संशय आणि भयग्रस्त बनले आहे. स्त्रियांच्या हक्कांवर, माणसाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे. स्त्रियांच्या हक्कांवर, प्रतिष्ठेवर होणारे हल्ले चिंतनीय आहेत. भारतीय संस्कृतीने स्त्रीला देवता मानले. समाज मात्र तिचे माणूसपणही नाकारतो आहे. स्त्रीला समानतेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. आदिवासी हेही समाजाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्या सक्षमीकरणासाठी, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाची धोरणे आखली गेली पाहिजेत.

महाराष्ट्राला संतांचा वारसा लाभला आहे. संतपंरपरेने आपली संस्कृती समृद्ध केली. तुकोबांनी ‘जे का रंजले गांजले’ हा संदेश आपल्याला दिला. तुकोबांचे वचन हे देशाचे मुख्य धोरण झाले पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळाले; परंतु, ७० वर्षानंतरही स्वातंत्र्याची किरणे गरिबांच्या झोपडीपर्यंत पोचली की नाहीत, हा खरा प्रश्न आहे. गरिबांना हा देश आपला वाटला पाहिजे. स्वातंत्र्य ही आपली जबाबदारी असून, ती प्रत्येकाने जबाबदारीनेच जपली पाहिजे.

Web Title: Indian should be the religion of everyone - Father Francis Dibrito

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.