भारतीय स्टार्ट अप्सनी आपली गरज समजावी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2016 01:29 AM2016-09-25T01:29:34+5:302016-09-25T01:29:34+5:30
राहुल नार्वेकर हे भारतातील स्टार्ट अप विश्वातील एक मान्यवर व्यक्तिमत्त्व आहे. फॅशन अँड यू आणि एन.डी.टी.व्ही. एथनिक रिटेल लिमिटेड या त्यांच्या दोन स्टार्ट अप्सला मोठ्या प्रमाणात
- कुणाल गडहिरे
राहुल नार्वेकर हे भारतातील स्टार्ट अप विश्वातील एक मान्यवर व्यक्तिमत्त्व आहे. फॅशन अँड यू आणि एन.डी.टी.व्ही. एथनिक रिटेल लिमिटेड या त्यांच्या दोन स्टार्ट अप्सला मोठ्या प्रमाणात व्यावसायिक यश मिळाले. छोट्या शहरातील स्टार्ट अप्स उद्योजकांसाठी त्यांनी द इंडिया नेटवर्क या नवीन व्यासपीठाची नुकतीच सुरुवात केली आहे, तसेच त्याच्या स्केल व्हेंचर्स या व्हेंचर कॅपिटलिस्ट संस्थेने १८ हून अधिक स्टार्ट अप्समध्ये व्यावसायिक गुंतवणूकदेखील केली आहे. वेगाने प्रगती करत असलेल्या भारतातील स्टार्ट अप्स इको सीस्टमबद्दल त्यांनी सांगितलेल्या या गोष्टी...
१) स्टार्ट अपची नेमकी व्याख्या कशी करता येईल?
स्टार्ट अप म्हणजे असा बिझनेस, जो अतिशय कमी वेळात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणखी सविस्तर सांगायचे तर एखादा बिझनेस जो अजून कोणी केलेला नाही किंवा सध्या अस्तित्वात असणाऱ्या उद्योग क्षेत्राला आपल्या कल्पकतेच्या जोरावर नव्याने विकसित करणे म्हणजे स्टार्ट अप असे म्हणता येईल. तुम्ही एखादा बिझनेस चालू केला आहे, परंतु तो अनेक वर्षांपासून तसाच चालू आहे, तो वाढतच नाहीये, तर त्याला स्टार्ट अप म्हणता येणार नाही.
२) गुंतवणूकदार या नात्याने, स्टार्ट अप इको सीस्टमकडे तुम्ही कसे पाहता ?
- स्टार्ट अप्सला अचानक भरपूर ग्लॅमर आले आहे. मी जेव्हा १९९९ साली म्युझिक चॅनेल सुरू केले होते, तेव्हा इको सीस्टम नव्हती, सामाजिक पाठिंबा नव्हता. आज स्टार्ट अपला गुंतवणूकदार मिळणे हे तुलनेने सोपे झाले आहे, पण स्टार्ट अप सुरू करताना या इको सीस्टमचा उद्योजकांकडून नीट अभ्यास केला जात नाही. फक्त बिझनेस आयडियाच्या जोरावर अनेक उद्योजक गुंतवणूकदारांकडे फंडिंगसाठी मागे लागतात. मात्र, आपल्या स्टार्ट अपची मार्केट किती आणि कोण आहे, प्रतिस्पर्धी कोण आहे यासारख्या मूलभूत गोष्टींचासुद्धा अभ्यास केला जात नाही. इन्व्हेस्टर हे याच कारणासाठी आयडियापेक्षा त्यामागच्या टीममध्ये आर्थिक गुंतवणूक करतात.
३) २०२० पर्यंत भारतातील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. भविष्यात त्याचा फायदा कसा होईल?
भारतामधील इंटरनेटचा प्रसार हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ही प्रत्यक्षात अतिशय कमी आहे. त्यामुळे जे मोठे स्टार्ट अप्स आहेत, त्यांनाही आता एका मर्यादेला सामोरे जावे लागत आहे, परंतु आता एक नवी इंटरनेट फ्रेंडली जनरेशन जन्माला येत आहे. ग्राहकांची ही नवी पिढी आॅनलाइन शॉपिंगला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या नव्या पिढीमध्ये, अगदी ग्रामीण भागांपर्यंत इंटरनेटचा जितका जास्त प्रचार होईल तितका जास्त फायदा स्टार्ट अप्सला निश्चित होईल. विशेष करून, ई-कॉमर्स, फॅशन, पर्यटन या क्षेत्रांना इंटरनेटच्या वाढत्या प्रसाराचा मोठ्या प्रमाणात फायदा
होईल.
४) ग्रामीण, निम शहरी भागांत इंटरनेटचा प्रसार वाढत असताना, आत्ता स्टार्ट अप्सने याकडे कशा प्रकारे पाहिले पाहिजे. त्यांनी नेमकी कशा प्रकारे तयारी केली पाहिजे?
मुंबईसारख्या शहरात वाढलेली आमची पिढी स्थानिक पातळीवरील भारताला नीट समजून घेत नाही. खरे सांगायचे तर मुळात भारत हा वेगवेगळ्या प्रांतांचा देश आहे. त्यांची भाषा वेगळी आहे. स्थानिक पातळीवरील लोकांची मानसिकता पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे ग्राहकांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधावा लागेल, पण याचा अर्थ इंग्रजीचे भाषांतर करणे असा नाही. कागदावरचे बिझनेस प्लान्स, गुगल सर्च या गोष्टींच्या पुढे
जाऊन स्थानिक स्तरावरील भारताचा
प्रत्यक्ष मैदानात उतरून अभ्यास करावा लागेल.
५) छोट्या शहरातील स्टार्ट अप्स संस्थापकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे ?
छोट्या शहरातील उद्योजक अनेकदा स्थानिक पातळीवरील यशावर समाधानी राहताना दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे, इन्व्हेस्टर हे आयडियापेक्षा ती प्रत्यक्षात कशा प्रकारे राबवली जात आहे, याबद्दल जास्त उत्सुक असतात. त्यामुळे थोडेसे जिद्दीने आपला बिझनेस वाढवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. नेटवर्किंगबरोबरच संवादासाठी लागणारे सॉफ्ट स्किल्स शिकले पाहिजेत. आपला बिझनेस इन्व्हेस्टर मंडळींना योग्य भाषेत समजावता आला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे, आपला बिझनेस वाढवण्यासाठी इतरांची मदत न लाजता मागितली पाहिजे.
गुंतवणूकदाराकडून फंडिंग मागण्यापूर्वी कोणत्या गोष्टींकडे लक्षात ठेवाव्यात?
बिझनेस काय आहे, हे समोरच्याला नेमकपणाने समजावता आले पाहिजे. तुमच्या बिझनेसच्या क्षेत्राचा जास्तीत जास्त रिसर्च केला पाहिजे. इन्व्हेस्टरला पाठवण्यात येणारे पिचडेक हे मोठे नको.
ते आटोपशीर हवे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या बिझनेससाठी गुंतवणूक (फंडिंग) मिळण्यापूर्वी तुमच्या बिझनेसला ग्राहक असले पाहिजेत. यामुळे तुमच्या बिझनेसची लोकांना गरज आहे, हे
स्पष्ट होते.
स्टार्ट अप्स भारतीय भाषांत यायला सुरुवात होईल का ?
स्टार्ट अप्सनी भारतीय भाषांत विशेष असे सध्या तरी काही केलेले नाही. कारण स्थानिक पातळीवर असलेल्या मार्केटचा योग्य अंदाज हा आत्तापर्यंत आलेला नव्हता, परंतु पुढील काळात हे चित्र बदलेल. स्टार्ट अप्सना ग्राहकांशी त्यांच्या भाषेत संवाद करणे हे गरजेचे होणार आहे. त्यामुळे भाषांतरकरांची आणि स्थानिक भाषेत प्रावीण्य असलेल्या लोकांची मोठ्या प्रमाणात गरज लागेल, पण संवाद
साधणे म्हणजे फक्त शब्दांचे भाषांतर व्हायला नको, तर स्थानिक पातळीवरील ग्राहकांची गरज आणि मानसिकता समजून घ्यावी लागेल.
सरकारी पातळीवर स्टार्ट अप्सच्या विषयात अनेक उपक्रम सुरू झाले
आहेत. त्याबद्दल तुम्ही किती समाधानी आहात ?
केंद्र सरकारकडून यासाठी निश्चितच चांगले उपक्रम सुरू झाले आहेत, परंतु योजना चांगल्या असल्या, तरी लाल फितीच्या कारभारामुळे त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे ग्राउंड लेव्हलवर याचा फायदा होताना दिसत नाही. महाराष्ट्र, स्टार्ट अप्सच्या बाबतीत गुणवत्ता असूनही मागे दिसतो. पुणे शहरात आज स्टार्ट अप्ससाठी चांगले वातावरण आहे, पण त्याचे श्रेय
हे तिथल्याच लोकांचे आहे. यात
सरकारी योगदान नाही. मुंबईतील
स्टार्ट अप्स महाराष्ट्राबाहेर बंगळुरूमध्ये स्थलांतर करताना दिसत आहे.
आज सरकारी पातळीवर, महाराष्ट्रात उदासीनता आहे, हे सकारात्मक चित्र नक्कीच नाही.
तुम्ही सुरू केलेल्या इंडिया नेटवर्क या संस्थेचा उद्देश काय?
गेल्या तीन वर्षांत मी इंडियारूट या स्टार्ट अपच्या कामासाठी भारतातील अनेक ठिकाणी फिरलो आहे. तेव्हा अनेकांशी संवाद साधताना, अनेक उद्योजक मार्गदर्शनाबद्दल विचारायचे. तेव्हा स्टार्ट अप्स चालू करण्याची इच्छा असणाऱ्या उद्योजकांना अनुभवी उद्योजकांना कनेक्ट करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची संकल्पना सुचली. नवीन आणि अनुभवी उद्योजकांना एकमेकांशी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जोडण्यात येईल. या संकल्पनेवर अजूनही मी काम करतोय आणि लवकरच याची सुरुवात होईल. सध्या इंडिया नेटवर्कसोबत स्टार्ट अप जगतातील १०० अनुभवी स्टार्ट अप्स संस्थापक जोडले गेले आहेत. महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, नागपूर यासारख्या शहरातही हे नेटवर्क काम करेल.