भारतीय छात्र संसद आजपासून पुण्यात
By admin | Published: January 17, 2017 01:29 AM2017-01-17T01:29:45+5:302017-01-17T01:29:45+5:30
पुणे व भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित सातव्या भारतीय छात्र संसदेस मंगळवार (दि. १७) पासून सुरुवात होत आहे
पुणे : माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट, पुणे व भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित सातव्या भारतीय छात्र संसदेस मंगळवार (दि. १७) पासून सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ११.३० वाजता संसदेचे उद्घाटन होणार आहे.
देशभरातील विद्यार्थी छात्र संसदेमध्ये सहभागी होणार आहेत. संसदेच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री विजय गोयल आणि पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित राहतील.
छात्र संसदेचा समारोप गुरुवारी (दि. १९) केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय राज्यमंत्री ऊर्जा व खनिज पीयूष गोयल आणि उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांना आदर्श मुख्यमंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
>विविध विषयांवर मंथन
याप्रसंगी लोकसभेचे माजी सभापती व ज्येष्ठ नेते सोमनाथ चटर्जी यांना जीवन गौरव पुरस्कार, खासदार अॅड. वंदना चव्हाण यांना गार्गी पुरस्कार, खासदार रानी नराह यांना मैत्रेयी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती समन्वयक प्रा. राहुल कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. तीन दिवस चालणाऱ्या संसदेमध्ये विविध विषयांवर मंथन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.