Indian tree day; सत्तर वर्षांपूर्वीचा साक्षीदार असलेला सोलापुरातील ‘वटवृक्ष’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 01:07 PM2019-05-15T13:07:08+5:302019-05-15T13:07:13+5:30
तथागत गौतम बुद्धांना बिहारमधील गया या ठिकाणी पिंपळ झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले होते.
संताजी शिंदे
सोलापूर : सम्राट अशोकाचा चिरंजीव राजा महेंद्र याने लावलेल्या पिंपळ वृक्षाची फांदी डोक्यावर घेऊन सोलापुरात आणण्यात आली अन् फॉरेस्टमधील गुडहॉल यांच्या जमिनीत लावली गेली़ आज त्याचा वटवृक्ष झालायं. सत्तर वर्षांपूर्वीचा साक्षीदार असलेला पिंपळ वृक्ष डॉ. आंबेडकर मेमोरियल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना आजही मायेची सावली देतोयं.
धम्म प्रचारक भन्ते एस.परमशांती हे सोलापूरातील फॉरेस्ट परिसरातील लोकांना ते बौद्ध धम्माची माहिती देत होते. १९५९ साली श्रीलंका येथे जागतिक स्तरावरील श्रामणेर शिबीर भरवण्यात आले होते. तेथे ते फॉरेस्टमधील ९ लोकांना सोबत घेऊन श्रीलंकेला गेले. तेथूनच त्यांनी हा पिंपळ वृक्षाची फांदी सोलापुरात आणली आणि सध्या जी डॉ. आंबेडकर मेमोरियल हास्कूलच्या प्रांगणात लावली.
तथागत गौतम बुद्धांना बिहारमधील गया या ठिकाणी पिंपळ झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. पिंपळाच्या झाडाची फांदी सम्राट अशोकाचा मुलगा राजा महिंद्र याने श्रीलंकेला नेली. तेथे लावण्यात आलेल्या फांदीचे मोठे वटवृक्ष झाले आहे. त्याच पिंपळ झाडाची फांदी भन्ते एस. परमशांती व त्यांच्या सहकाºयांनी डोक्यावर आणली.
चेन्नई ते मुंबई या रेल्वेतून प्रवास करताना खाली न ठेवता त्यांनी पाळी-पाळीने ती डोक्यावर घेतली होती. फॉरेस्टमध्ये आणल्यानंतर पिंपळ वृक्षाची छोटी मिरवणूक काढून त्याचे महत्व स्थानिक लोकांना सांगण्यात आले होते. भन्ते यांची सेवा व झाडाची निगा तत्कालीन मारूती सुरवसे व साधू शेंडगे करीत होते. याच जागेत डॉ. आंबेडकर हायस्कूलची स्थापना झाली आणि हे झाड विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यात सावलीचे थंड ठिकाण झाले आहे. सध्या शाळेचे शिपाई शिरीष सुरवसे हे या झाडाची निगा राखत आहेत.
येथे होते मिरवणुकीची सांगता...
- गौतम बुद्ध जयंतीनिमित्त शहरातून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीची सांगता या पिंपळ (बोधी) वृक्षाजवळ होत असते. विविध सामाजिक संघटना, तरूण मंडळांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाची मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीची सांगता याच पिंपळ वृक्षाजवळ होते. बौद्ध गयेच्या मातीतून श्रीलंकेच्या मातीत उगवलेले पिंपळाचे झाड आज सोलापूरच्या मातीत उगवले आहे.
ज्या पिंपळ वृक्षाखाली तथागत गौतम बुद्धांचे वास्तव्य झाले. बौद्ध गयेचा अंश असलेले पिंपळाचे झाड आज डॉ. आंबेडकर हायस्कूलमध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपात उभे आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो.
- भागवत सरवदे, अध्यक्ष, डॉ. आंबेडकर मेमोरियल ट्रस्ट, सोलापूर