भारताचे ५ खेळाडू उपांत्य फेरीत
By admin | Published: June 2, 2017 02:49 AM2017-06-02T02:49:59+5:302017-06-02T02:49:59+5:30
भारताचे सिद्धांत बांठिया, महक जैन, मेघ भार्गव पटेल, नितीन कुमार सिन्हा, मिहिका यादव यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारताचे सिद्धांत बांठिया, महक जैन, मेघ भार्गव पटेल, नितीन कुमार सिन्हा, मिहिका यादव यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून, १८ वर्षांखालील आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलतील एमएसएलटीए स्कूल आॅफ टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या जागतिक क्र.२९४ असलेल्या नितीन कुमार सिन्हा याने जागतिक क्रमवारीत १२९ असलेल्या जपानच्या तैसेई इचिकावाचा ४-६, ६-२, ७-६(७) असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. जागतिक क्र.१९६ असलेल्या मलेशियाच्या चीन क्रिस्टियन्स दिदिअरने जागतिक क्र.१५० असलेल्या भारताच्या ध्रुव सुनीशचे आव्हान ७-६(२), ६-४ असे मोडीत काढले. अव्वल मानांकित व भारताच्या सिद्धांत बांठिया याने आपली विजयी मालिका कायम ठेवत तैपेईच्या हो रे याचा ३-६, ६-३, ६-१ असा तीन सेटमध्ये पराभव केला. काल मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळविणाऱ्या जागतिक क्र.५१६ असलेल्या भारताच्या मेघ भार्गव पटेल याने दिग्विजय सिंगचा ६-४, ६-४ असा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले.
मुलींच्या गटात अव्वल मानांकित व भारताच्या महक जैन हिने सालसा आहेरवर ६-२, ६-२ असा विजय मिळवत आगेकूच केली.
भारताच्या व दुसऱ्या मानांकित मिहिका यादवने जपानच्या फुना कोझाकीचे आव्हान ६-१, ६-२ असे संपुष्टात आणले. तैपेईच्या व चौथ्या मानांकित ली कुआन यी हिने सातव्या मानांकित व भारताच्या वैदेही चौधरीचा ६-४, ६-४ असा संघर्षपूर्ण पराभव केला.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सिद्धांत बांठियाने जपानच्या जेम्स ट्रॉटरच्या साथीत तैपेईच्या हो रे व चीनच्या मुताओचा ६-४, ७-६(३) असा पराभव केला. दिग्विजय सिंग व नितीन कुमार सिन्हा या भारतीय जोडीने परीक्षित सोमाणी व ध्रुव सुनीशला ७-६(२), ६-२ गुणांनी नमविले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
एकेरी गट: उपांत्यपूर्व फेरी: मुले: सिद्धांत बांठिया (भारत,१) वि.वि.हो रे (तैपेई) ३-६, ६-३, ६-१; मेघ भार्गव पटेल (भारत) वि.वि.दिग्विजय सिंग (भारत) ६-४, ६-४; चीन क्रिस्टियन्स दिदिअर (मलेशिया) वि.वि.ध्रुव सुनीश (भारत,७) ७-६(२), ६-४; नितीन कुमार सिन्हा (भारत) वि.वि.तैसेई इचिकावा (जपान,३) ४-६, ६-२, ७-६(७);
मुली: महक जैन (भारत,१) वि.वि.सालसा आहेर (भारत) ६-२, ६-२; ली कुआन यी (तैपेई,४) वि.वि. वैदेही चौधरी (भारत,७) ६-४, ६-४; माई नपात निरुद्रोण (थायलंड,५) वि.वि. मना कवामुरा (जपान) ६-१, १-६, ७-५; मिहिका यादव (भारत,२) वि.वि.फुना कोझाकी (जपान) ६-१, ६-२.
दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी: मुले: सिद्धांत बांठिया (भारत) /जेम्स ट्रॉटर (जपान)वि.वि. हो रे(तैपेई)/मु ताओ (चीन)६-४, ७-६(३) दिग्विजय सिंग (भारत) /नितीन कुमार सिन्हा (भारत) वि.वि. परीक्षित सोमाणी (भारत) /ध्रुव सुनीश (भारत) ७-६(२), ६-२ ओटीको (फिलिपिन्स) /सेइता वात्नाबी(जपान) वि.वि.मृत्युंजय बडोला (भारत)/ रिषभ शारदा(भारत) ६-२, ६-४ हो डेंटन (हाँग काँग)/ लॅम चिंग (हाँग काँग) वि.वि तैसेई इचिकावा (जपान)/ रियुकी मत्सुदा(जपान) ६-२, ७-५