भारतातील मीडिया स्वतंत्रच राहील, जगभरात 'नरेटिव्ह' सेट करण्याची आपली ताकद: अनुराग ठाकूर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 07:11 PM2023-04-02T19:11:03+5:302024-02-06T11:19:04+5:30
Lokmat National Media Conclave: भारतात ५ जी नेटवर्क आलेय. देशाच्या कानाकोपऱ्यात नेटवर्कचे जाळे उभारले जात आहेत. भारताकडे ६ जी नेटवर्कही आपलेच असेल.
नागपूर - जगभरात नॅरेटिव्ह काय बनवायचं हे भारतीय माध्यमे ठरवू शकतात त्याची ताकद येथील माध्यमांमध्ये आहे. नव भारत, सशक्त भारत हा विचार जगभरात देण्याचं काम भारतीय माध्यमे करतील. भारताचा नेरिटिव्ह परदेशी माध्यमे ठरवू शकत नाहीत तर येथील माध्यमे, जनता ठरवतील असं परखड मत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये मांडले.
मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, ऑनलाईन बातम्या देणाऱ्यांमध्ये भारत पुढे आहेत. भारतात ज्ञानाची कमतरता नाही. भारताकडे आज सर्वकाही आहे जे विकसित देशांकडे आहे. भारतात ५ जी नेटवर्क आलेय. देशाच्या कानाकोपऱ्यात नेटवर्कचे जाळे उभारले जात आहेत. भारताकडे ६ जी नेटवर्कही आपलेच असेल. डिजिटल माध्यमे रिजनल राहिले तर इंटरनॅशनल झालंय. कंटेन्टमध्ये दम असला तर लोकल ते ग्लोबल व्हायला वेळ लागणार नाही. जगातील ज्या वृत्तपत्रांना मोठे म्हटले जाते त्यापेक्षा आपला रिच, व्ह्यूअर्स जास्त आहे. भारतीय माध्यमे परदेशी माध्यमांना टक्कर देण्यास कुठेही कमी नाहीत असं त्यांनी सांगितले.
सोशल मीडियाच्या बातम्या ट्रेंड होतात
आणीबाणीच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबला, त्यावेळी वृत्तपत्रांचा बोलबाला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई त्याकाळीही भाजपाने लढली होती. आजही अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुणापासून हिरावून घेतले जात नाही. टेलिव्हिजनचं युग आले. इंटरनेट आल्यापासून कुणीही पत्रकार होऊ शकते हे कळालं. आज जिथं मीडिया पोहचू शकत नाही तिथे सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रेडिंग बातम्या होतात. त्या प्रमुख माध्यमांमध्ये झळकतात. भारतातील मीडिया जितका स्वातंत्र्य होता, तो आजही स्वातंत्र्य आहे आणि भविष्यातही स्वातंत्र्य राहील असं मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
'त्यांना' कोण प्रश्न विचारणार?
माध्यमांची भूमिका काय? आणि ते कोण ठरवणार? नेरिटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय माध्यमे करतायेत. १४० कोटींच्या देशात कोण नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करू शकतं का? मोदींविरोधात जितका दुष्प्रचार केला जातो त्यातून ते आणखी मजबुतीने उभे राहतात. देशाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय माध्यमाकडून होतो पण त्यात आता आपले देशातील राजकीय नेतेही त्याचा फायदा घेतात. देशात कोरोना लस निर्माण झाली पण त्यावरही प्रश्न उपस्थित केले. भारतात कोट्यवधी लोकं मरतील असा रिपोर्ट आला मग आता त्यांना कुणी प्रश्न विचारणार का? असा सवाल मंत्री अनुराग ठाकूर यांनी विचारला.