देशातील कांद्याची निर्यात मालदीवला होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 05:14 AM2020-02-15T05:14:56+5:302020-02-15T05:15:07+5:30
केंद्राचा निर्णय : मात्र २० हजार क्विंटलची मर्यादा
नाशिक : देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कांद्याचे दर कमी होत असतानाच केंद्र सरकारने मालदीवला २० हजार क्विंटल कांदा निर्यात करण्याचे ठरविले आहे. परकीय व्यापार महासंचालकांनी तसा आदेश काढला आहे.
देशात वेगाने दर वाढत असल्याने सप्टेंबरच्या अखेरीस केंद्राने कांद्याची निर्यातबंदी केली आणि कांद्याची आयात करणे सुरू केले. दरम्यानच्या काळामध्ये कांद्याचे पीक आल्याने पुरवठा वाढून त्याचे दरही काहीसे कमी झाले. त्यामुळे सरकार व ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. सध्या बाजारपेठांत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे दर कमी होत असून केंद्राने निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
त्यामुळे केंद्राने मालदीवला २० हजार क्विंटल कांदा निर्यात करण्यास संमती दिली असून, तो तामिळनाडूच्या तुतीकोरीन बंदरामधून पाठवला जाणार आहे. सन २०१९-२०च्या कोट्यामधून मालदीवला ही निर्यात केली जाणार आहे. या निर्यातीसाठी घालून दिलेल्या कोट्यावर तुतीकोरीनचे कस्टम खाते लक्ष ठेवेल. मालदीवमध्ये कांदा काय दराने विकणार, त्याची खरेदी-विक्री कोण करणार, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. सध्याचा दोन हजार रुपयांचा दर आणि तुतीकोरीनपर्यंत क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपये वाहतूक खर्च आणि निर्याती खर्च याचा विचार करता हा व्यवहार किती फायद्याचा राहील, याबाबत तज्ज्ञांना आहे.
निर्यातीच्या निर्णयामुळे देशातील कांदा उत्पादकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. अंशत: का होईना निर्यात होणार असल्यामुळे बाजारपेठांमध्ये विक्रीस येणाऱ्या कांद्याच्या दरात भविष्यात काही प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
केंद्राने दिलेली सवलत तोकडी आहे. निर्यातबंदी पूर्णपणे उठविण्याची गरज आहे. वस्तुत: निर्यातबंदी करणेच चुकीचे आहे. त्यामुळे कांदा आयात करणाऱ्यांना आपल्या देशाबद्दल शंका येते. कालांतराने आपल्या निर्यातीवर त्याचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो. केंद्राने निर्यातबंदी न करता देशात कांद्याचे दर चढे असल्यास किमान निर्यातमूल्य वाढविले तरी कांदा बाहेर जाणार नाही. मात्र त्यामुळे आंतरराष्टÑीय बाजारपेठेत देशाबद्दल संशयाचे वातावरण निर्माण होणार नाही.
- चांगदेवराव होळकर, माजी संचालक, नाफेड