राज्यातील ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये व्यवहार सुरू होण्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 07:22 AM2020-04-13T07:22:30+5:302020-04-13T07:23:14+5:30
लॉकडाउन शिथिल करणार : मात्र ‘रेड’ जाहीर केलेल्या परिसरात निर्बंध आणखी कठोर होणार
मुंबई : कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. ग्रीन आणि आॅरेंज झोनमधील जिल्ह्यांमधील खबरदारीची उपाययोजना करून उद्योग व व्यवहार सुरू करण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी व्हिडीओ संवाद साधला. याच संवादात कोरोना रुग्णसंख्येनुसार जिल्हा व प्रमुख महानगरांची तीन भागांत विभागणी करण्याचे निर्देश दिले होते. येत्या एक - दोन दिवसांत केंद्राकडून याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
ग्रीन आणि आॅरेंज झोनमध्ये काही उपाययोजना करून येथील व्यवहार सुरू करता येऊ शकतात. त्यानुसार या झोनमधील जिल्ह्यांच्या सीमा सील करून तेथील उद्योग आणि व्यवहार सुरू करण्यावर चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना हाती येताच तसा निर्णय होऊ शकतो. जे उद्योग आपल्या कारखान्यात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची हमी देतील, तेथे तशी व्यवस्था करतील आणि कामगारांची व्यवस्था कारखान्यातच करतील, असे उद्योग सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचेही टोपे म्हणाले. मात्र, ‘रेड झोन’मधील जिल्ह्यांत ‘लॉकडाउन’ अधिक कडक करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे. केंद्राने काही प्रमाणात ‘लॉकडाउन’ शिथिल केले तरी मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ‘लॉकडाउन’ शिथिल होणे कठीण असल्याचे संकेत आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले आहेत.
बाधितांच्या संख्येनुसार तीन झोनमध्ये विभागणी
केंद्र सरकारने १५ आणि त्यापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या भागाला ‘रेड झोन’
म्हणून जाहीर करावे, १५ पेक्षा कमी रुग्ण असलेल्या भागाला ‘आॅरेंज झोन’ म्हणून तर एकही रुग्ण नसेल अशा भागाला ‘ग्रीन झोन’ म्हणून घोषित करण्यास सांगितले आहे.
रेड झोन : मुंबई, ठाणे, पालघर,
पुणे, नागपूर, रायगड,
सांगली, औरंगाबाद.
आॅरेंज झोन : रत्नागिरी,
सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड,
जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोदिया.
ग्रीन झोन : धुळे, नंदूरबार, सोलापूर, परभणी,
नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली.