मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत ब-याच घडामोडी घडतील, राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 07:39 PM2017-10-05T19:39:21+5:302017-10-05T19:39:53+5:30
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपाने स्वीकारले नसल्याने त्यांना नवीन पक्ष काढावा लागला आहे. मात्र आता त्यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले असले तरी मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत ब-याच घडामोडी घडतील, असे संकेत राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपाने स्वीकारले नसल्याने त्यांना नवीन पक्ष काढावा लागला आहे. मात्र आता त्यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले असले तरी मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत ब-याच घडामोडी घडतील, असे संकेत राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. आमच्या पक्षप्रमुखांवर राणेंनी टीका केली तर ती सहन करणार नाही, असा इशाराही मंत्री केसरकर यांनी दिला. ते सावंतवाडी येथे बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघप्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, विधानसभा संपर्कप्रमुख प्रकाश परब, अशोक दळवी, माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, बाळू माळकर आदी उपस्थित होते. मंत्री केसरकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपाने स्वीकारले नाही. भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे. त्यामुळे राणेंची पार्श्वभूमी पाहून तो त्यांना स्वीकारणार नव्हते. आता नवीन पक्ष काढला आहे. मात्र नवीन पक्षाला एनडीएमध्ये घेत असताना त्यांची व त्यांच्यासोबत असलेल्यांची पार्श्वभूमी तपासावी. अनेकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. मग हे नेते भाजपाला चालतील का? याचाही विचार करावा. जेव्हा आपण भ्रष्टाचारमुक्त भारत असा नारा देतो तेव्हा भ्रष्टाचार करणा-या व ज्यांच्या चौकशी सुरू आहेत अशांना पक्षात घेणार का? हेही बघितले पाहिजे.
काम कमी, जाहिरात जास्त
राणे हे मंत्री असताना सिंधुदुर्गचा विकास झाला नाही, त्यापेक्षा अधिक विकास आमच्या काळात झाला आहे. मोठ्या प्रमाणात निधी जिल्ह्यात आणला आहे. विकास प्रगतिपथावर आहे. उलट राणे यांनी मुख्यमंत्री असताना काय काम केले ते त्यांनी जाहीर करावे. राणे हे काम करतात कमी आणि जाहिरात जास्त करतात, अशी टीकाही यावेळी मंत्री केसरकर यांनी केली. राणे यांनी स्वतंत्र पक्ष काढला तो चालवावा, पण त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करू नये. अन्यथा आम्हाला त्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
दहशतीने ग्रामपंचायती आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न
सावंतवाडी तालुक्यात आम्ही एकाच ग्रामपंचायतीत अर्ज सादर केले नाहीत, तर काही ठिकाणी गाव पॅनेल असल्याने त्यांना समर्थन दिले. पण आता काहींनी दहशतीच्या जोरावर गाव पॅनेल असलेल्या ग्रामपंचायती आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. गाव पॅनेल निवडून आले त्यातील अनेकांनी मला फोन करून आमचे गाव पॅनेल असून, तुमच्याकडे विकासकामासाठी केव्हाही येऊ शकतो, असे सांगितले आहे. मी सर्वांना विकासासाठी मदत करणार आहे. असे सांगत गाव पातळीवरच्या राजकारणात मी कुठेही हस्तक्षेप करणार नसल्याचेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.