घोसाळकरांवर कारवाईचे सेनेचे संकेत
By admin | Published: January 25, 2017 03:56 AM2017-01-25T03:56:19+5:302017-01-25T03:56:19+5:30
ऐन निवडणुकीच्या तोंडावर दहिसर विभागातील अंतर्गत वाद उफाळून आल्याने शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत. येथील पक्षांतर्गत
मुंबई : ऐन निवडणुकीच्या तोंडावर दहिसर विभागातील अंतर्गत वाद उफाळून आल्याने शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत. येथील पक्षांतर्गत वाद शमविण्यासाठी पक्षाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी आपल्याच पक्षाचे नगरसेवक शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांच्याविरोधातील तक्रार मागे घ्यावी अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पक्षाने दिला आहे.
दहिसर येथील एका उद्यानाचे उद्घाटन आणि एका कार्यक्रमामुळे आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार घोसाळकर यांनी आयोगाकडे केली होती. यामुळे शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव या तीनही उमेदवारांची उमेदवारी धोक्यात आली आहे. पक्षांतर्गत गटबाजीने फटका बसू नये यासाठी सेना नेतृत्वाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. दहिसर येथील उद्यानाचे १० जानेवारी रोजी उद्यानाचे उद्घाटन झाले. मात्र १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून झालेल्या स्नेहसंमेलनाला शुभा राऊळ यांच्याबरोबर नगरसेविका शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव हे आमंत्रित होते. मात्र या कार्यक्रमावर अभिषेक घोसाळकर यांनी आक्षेप घेतला. दरम्यान, अधिकार नसताना महापालिकेच्या सहायक आयुक्तांनी गुन्हे दाखल केल्याची लेखी तक्रार शुभा राऊळ यांनी आयुक्तांकडे केली आहे. (प्रतिनिधी)