देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त
By admin | Published: February 13, 2016 02:28 AM2016-02-13T02:28:44+5:302016-02-13T02:28:44+5:30
दोघांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
अकोला: रतनलाल प्लॉट चौकामध्ये देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे घेऊन फिरणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी मध्यरात्री अटक केली. मनीष भारती व अर्जुन तिवारी असे आरोपींचे नाव असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी केली. गौरक्षण रोडवरील रहिवासी भारती व तिवारी या दोघांकडे देशी बनावटीचे एक पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांचा शोध घेऊन त्यांच्यावर पाळत ठेवली. या दोघांच्याही संशयास्पद हालचाली सुरू असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. भारती व तिवारी यांची झडती घेऊन देशी बनावटीचे एक पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जितेंद्र सोनवणे, अशोक चाटी यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी केली.