इंडिगो बंगळुरूच्या विमानात बिघाड
By admin | Published: January 8, 2015 01:17 AM2015-01-08T01:17:34+5:302015-01-08T01:17:34+5:30
बंगळुरूला जाणाऱ्या इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रात्री हे विमान बंगळुरूला जाऊ शकले नाही. त्यामुळे विमानातील ९० प्रवाशांनी एकच गोंधळ घातला. रात्री उशिरापर्यंत हे विमान
प्रवाशांचा गोंधळ : दुसऱ्या विमानाची व्यवस्था
नागपूर : बंगळुरूला जाणाऱ्या इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रात्री हे विमान बंगळुरूला जाऊ शकले नाही. त्यामुळे विमानातील ९० प्रवाशांनी एकच गोंधळ घातला. रात्री उशिरापर्यंत हे विमान विमानतळावर अडकून पडले होते. रात्री २ वाजता मुंबईवरून दुसरे विमान बोलविल्यानंतर इतर प्रवासी बंगळुरूकडे रवाना झाले.
इंडिगो एअरलाईन्सचे ६ ई ४३६ हे विमान रात्री ९.३० वाजता नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. हे विमान नागपूरवरून पहिल्यांदा इंदूरला आणि तेथून बंगळुरूला जाते. परंतु इंदूरकडे जाण्यासाठी पायलटने विमान सुरू करताच विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे त्याच्या लक्षात आले. खूप प्रयत्न करूनही विमान सुरू होत नव्हते. अखेर या विमानातील प्रवाशांना खाली उतरवून टर्मिनल बिल्डिंगमध्ये आणण्यात आले. विमानातील बिघाड दुरुस्त होत नसल्यामुळे यातील ९० प्रवासी संतापले. त्यांनी विमानतळावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. परंतु रात्री उशिरापर्यंत विमानातील बिघाड दुरुस्त झाला नाही. इंडिगो एअरलाईन्सने या विमानातील प्रवाशांना भोजनाची आॅफर दिली. दरम्यान, विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त न झाल्यामुळे इंडिगो एअरलाईन्सने मुंबईवरून दुसरे विमान बोलविले. रात्री २ वाजता हे विमान आल्यानंतर प्रवासी बंगळुरूकडे रवाना होणार असल्याचे विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सीताराम येचुरी विमानतळावर अडकले
‘लोकमत समाचार’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित परिसंवादात सहभागी होण्यासाठी खासदार सीताराम येचुरी नागपुरात आले होते. याच विमानाने ते बंगळुरूला जाणार होते. उद्या सकाळी त्यांची महत्त्वाची बैठक बंगळुरूला होती. परंतु या गोंधळामुळे ते विमानतळावर अडकून पडले. अखेर रात्री दिल्लीवरून आलेल्या आणि पुण्याला जाणाऱ्या विमानात त्यांची व्यवस्था करण्यात आली. सकाळी पुण्यावरून ते बंगळुरूला रवाना होणार आहेत.