इंदिराजींनी देशाचा लौकीक वाढविला - फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 04:07 AM2017-08-10T04:07:14+5:302017-08-10T04:07:22+5:30
चार वेळा देशाच्या पंतप्रधान राहिलेल्या गांधी यांनी आपल्या कणखर भूमिकेने आणि धाडसी निर्णयांनी भारताची स्वतंत्र ओळख निर्माण केली. देशाचा लौकीक वाढविला, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
मुंबई : माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांची प्रतिमा केवळ देशातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रभावी महिला नेत्या अशीच होती. चार वेळा देशाच्या पंतप्रधान राहिलेल्या गांधी यांनी आपल्या कणखर भूमिकेने आणि धाडसी निर्णयांनी भारताची स्वतंत्र ओळख निर्माण केली. देशाचा लौकीक वाढविला, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विधिमंडळात त्यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडला, त्या वेळी ते बोलत होते.
‘लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढताना इंदिराजींनी पंतप्रधान म्हणून देशहिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पाकिस्तानपासून असणारा धोका टाळताना त्यांची बांग्लादेशची निर्मिती करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. त्यांच्या या कार्याचे कौतुक करताना तत्कालिन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना ‘रणचंडिका - दुर्गा’ अशा उपमा दिल्या,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनीही या वेळी इंदिरा गांधीच्या कर्तृत्वाला अभिवादन केले. ‘इंदिराजींनी आयुष्यभर गरीब, शोषित, मागास आणि अल्पसंख्यकांसाठी लढा दिला. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवाद हा शब्द समाविष्ट करण्यात त्यांचा पुढाकार होता. पंतप्रधान झाल्यानंतर अनेकांनी त्यांना गुंगी गुडिया संबोधले.
पण पाकिस्तानचे तुकडे केल्यानंतर त्यांचा दुर्गा म्हणून सर्वत्र गौरव
झाला.
गुंगी गुडिया से दुर्गा तक का सफर
ना ही इतना आसान होता है...
कभी शक्तिस्थलआकर देखो
देश के लिये खुद को तबाह करना
कितना हसीन होता है.... या पंक्तींनी विखे यांनी भाषणाचा समारोप केला.
दरम्यान, देशहितासाठी जोखीम पत्करणाºया प्रसंगी कणखर भूमिका घेऊन देशहित जपणाºया जिगरबाज नेत्या म्हणजे इंदिरा गांधी, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी या वेळी इंदिरा गांधी यांचा गौरव केला.
‘तुरुंगवास भोगणाºयांना पेंशन’
आणिबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या लोकांना काही राज्यांत पेंशन योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्टÑातही अशी योजना लागू करण्यासंदर्भात राज्य सरकार विचार करेल, असे आश्वासन भाषणाचा समारोप करताना मुख्यमंत्र्यांनी दिले.