Indorikar Maharaj: ...म्हणून इंदोरीकर महाराजांवर कारवाई करता येणार नाही; आरोग्य विभागाने सांगितले 'हे' कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 04:42 PM2020-02-25T16:42:14+5:302020-02-25T16:49:23+5:30
इंदोरीकर महाराज यांनी ओझर येथे झालेल्या कीर्तनात वादग्रस्त विधान केल्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
पुत्रप्राप्तीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकलेले प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. इंदोरीकर महाराजांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ यू ट्युबवर उपलब्ध नसल्याचा अहवाल सायबर सेलने आरोग्य विभागाला दिला आहे. त्यामुळे पुराव्याअभावी इंदोरीकर महाराजांवर कारवाई करता येणार नसल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
इंदोरीकर महाराज यांनी ओझर येथे झालेल्या कीर्तनात वादग्रस्त विधान केल्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच तशी तक्रार अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सकांकडे करण्यात आली होती. तक्रारीनंतर आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
इंदोरीकरांच्या वक्तव्याची शहानिशा करण्यासाठी आरोग्य विभागाने पोलिसांना सांगितलं होतं. पोलिसांच्या तपासाचा अहवाल आला असून असा कोणताही व्हिडिओ यू ट्युबवर उपलब्ध नसल्याचं पोलिसांच्या सायबर सेलनं आरोग्य विभागाला कळवलं असल्याची माहिती सिव्हिल सर्जन डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. तसेच ज्या वर्तमानपत्रात या बाबतची बातमी आली होती, त्यांना देखील नोटीस पाठवून खुलासा मागविला होता. परंतु अद्याप खुलासा आला नसल्यामुळे त्यांना पुन्हा पत्र पाठविण्यात येत असल्याचं मुरंबीकर यांनी सांगितलं. त्यामुळे जोपर्यत ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यत इंदोरीकर महाराजांवर कोणतीच कारवाई करता येणार नाही असं देखील प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले.
इंदोरीकर महाराज यांनी यापूर्वीच आरोग्य विभागाकडे आपली बाजू मांडत मी ते वाक्य बोललोच नाही. मी असं कीर्तन केलंच नसल्याचे सांगितले होते. तसेच यू ट्युबला आम्ही काही टाकत नाही आणि रेकॉर्डिंग देखील करत नाही असा खुलासा देखील इंदोरीकर महाराजांनी केला होता.